संग्रहित फोटो
पुणे : पुण्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली असून, दररोज खून, खुनाचा प्रयत्न, लुटमार यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नातेवाईक महिलेला शिवीगाळ केल्याचा जाब विचारत चौघांनी तरुणाच्या घरात प्रवेश करून त्याच्यासह वडिलांवर चाकूने हल्ला केला आहे. फुरसुंगीतील संकेत विहारमध्ये घडलेल्या या घटनेत पिता-पुत्र दोघे जखमी झाले आहेत.
याप्रकरणी याज्ञवल्क्य मदनलाल तिवारी (वय २२), आदर्श शारदा तिवारी (दोघे रा. भोसले व्हिलेज, फुरसुंगी), आशीष मिश्रा आणि एका अनोळखी व्यक्तीवर फुरसुंगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनुज राजेश पांडे (वय २६, रा. संकेत विहार, फुरसुंगी) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, (दि. ३१ जुलै) सकाळी सव्वाआठ वाजता आरोपी पांडे यांच्या घरी आले. नातेवाईक महिलेला शिवीगाळ का केली, असे म्हणत त्यांनी वाद घातला. आरोपींनी शिवीगाळ व हाताने मारहाण केली. याज्ञवल्क्य तिवारी याने चाकूने पांडे यांच्या डाव्या हाताच्या दंडावर, कोपरावर आणि कानाजवळ वार केले. भांडण सोडविण्यास आलेल्या पांडे यांच्या वडिलांच्या दोन्ही मनगटांवरही चाकूने वार करण्यात आले. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.
सिल्लोडमधील खुनाचा अखेर उलगडा
सिल्लोड शहरात २९ जुलै रोजी झालेल्या खुनाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून याप्रकरणी मयताच्या पत्नीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. सिल्लोड शहरालगत २९ जुलै २०२६ रोजी एका पेट्रोल पंपाच्या पाठीमागील भागात एका व्यक्तीचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या खून प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात येऊन पोलिस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे यांच्याकडे तपास देण्यात आला. सिल्लोड शहर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अवघ्या चार दिवसांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.






