Photo Credit- Social Media पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाका...; असदुद्दीन ओवेसींची मागणी
आदिलाबाद: एआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी केंद्र सरकारवर, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मंगळवारी तेलंगणातील आदिलाबाद येथे एका सभेला संबोधित करताना ओवैसी यांनी थेट केंद्र सरकारला आव्हान दिलं आहे. जर भाजप (BJP) नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये दम असेल तर त्यांनी चीनमध्ये थेट सर्जिकल स्ट्राईक (Surgical Strike) करून दाखवावं, असं म्हणत केंद्र सरकारला आव्हान दिलं आहे. भाजपचे राज्य प्रमुख संजय यांनी तेलंगणाच्या जुन्या शहरावर सर्जिकल स्ट्राईक करण्याबाबत वक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्याचा समाचार घेताना ओवैसींनी भाजपला आव्हान दिलं आहे.
भाजपचे लोक म्हणतात तेलंगणाच्या जुन्या शहरावर सर्जिकल स्ट्राईक करणार. आम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का? जर भाजपमध्ये इतका दम असेल तर त्यांनी चीनवर सर्जिकल स्ट्राईक करुन दाखवावा, असं ओवैसी यांनी म्हटलं आहे. बंदी संजय 2020 साली एका सभेला संबोधित करताना म्हणाले होते की, भारत राष्ट्र समिती (BRS) आणि AIMIM प्रमुख ओवैसी हे रोहिंग्या, पाकिस्तानी आणि अफगाण मतदारांच्या मदतीने जीएचएमसीच्या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत.
केसीआर आणि औवेसी यांच्यात गुप्त करार झाल्याच्या दाव्यावरून ओवैसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. जर स्टेअरिंग माझ्या हातात असेल तर अमित शहांना वेदना का होतात? भाजपने मंदिरांसाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले आणि त्यानंतरही ते माझ्यावर आरोप करतात की, स्टेअरिंग माझ्या हातात आहे. तुम्हाला का त्रास होतोय?
मंदिरांसाठी पैसे
ओवैसी पुढे म्हणाले की, तेलंगणातील काँग्रेसचे नेते म्हणतात राज्यात त्यांचं सरकार आलं तर 100 मतदारसंघात ते राम मंदिर बांधणार आहेत आणि त्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधीदेखील उपलब्ध करुन देणार आहेत. त्यानंतर भाजपचे नेते म्हणतात की, मुस्लिमानांचे तुष्टीकरण केले जात आहे. मंदिरांना पैसे दिले जातात यावर तेलंगणातील मुस्लिमांचा आक्षेप नाही. आक्षेप यावर आहे की, पैसे द्यायचेच असतील तर प्रत्येकाला पैसे द्या, फक्त एकाचा धर्माला देऊ नका.