नवी दिल्ली – गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते रविवारी सुरतच्या रुदरपुरा खाडी भागात एका निवडणूक सभेला संबोधित करत असताना तेथे उपस्थित काही मुस्लिम तरुणांनी त्यांना विरोध केला. तसेच त्यांना काळे झेंडे दाखवले. याशिवाय ‘मोदी, मोदी’च्या घोषणाही देण्यात आल्या. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
या क्लिपमध्ये ओवेसी मंचावर असून एका जाहीर सभेला संबोधित करत असताना तेथे उपस्थित काही लोक मोदी-मोदीच्या घोषणा देत असल्याचे दिसत आहे. काही लोक त्यांना गप्प करतात. यादरम्यान गर्दीत उभे असलेले तरुण ओवेसींना काळे झेंडे दाखवू लागले. त्याचवेळी एआयएमआयएम प्रमुखांच्या विरोधात ‘ओवेसी गो बॅक’च्या घोषणा सुरू झाल्या.
जिथे भाजप, काँग्रेस आणि आप गुजरात निवडणुकीसाठी मेहनत घेत आहेत. त्याचबरोबर AIMIM सुद्धा पूर्ण ताकद दाखवत आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे देखील गुजरातमध्ये निवडणुकीच्या संदर्भात सक्रिय असून रॅली काढत आहेत. त्यांचे संपूर्ण लक्ष अल्पसंख्याक मतांकडे आहे.
नुकतेच ओवेसी यांनी गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर खिल्ली उडवली होती. ते म्हणाले- जो पक्ष २७ वर्षात निवडणूक जिंकू शकला नाही, तो पक्ष महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी स्टेडियमचे नाव बदलण्याची भाषा करत आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव बदलून सरदार पटेल स्टेडियम करण्याचे आश्वासन दिले आहे.