अभिनेता पवन सिंह बिहार विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. या सगळ्यात बिहारच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भोजपुरी चित्रपटांचे सुपरस्टार आणि गायक पवन सिंह बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्या अनुषंगाने पवन सिंह आज (३० सप्टेंबर) सकाळी १० वाजता राष्ट्रीय लोक समता पक्षाचे (आरएलएसपी) अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेणार आहेत.
एनडीएचे दीर्घकाळ समर्थक असलेले पवन सिंह यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे. पण त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षाही अनेकदा समोर आली आहे. त्यामुळे पवन सिंह आज उपेंद्र कुशवाहा यांची भेट घेणार आहेत. बिहारच्या २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत पवन सिंह आरा विधानसभा मतदारसंघातून एनडीएचे उमेदवारी मिळवण्यासाठी ही भेट घेत असल्याचे बोलले जात आहे. बिहारमध्ये निवडणुकीच्या हालचालीही वाढल्या आहेत. त्यामुळे पवन सिंह राजकीय मंचावर आपली उपस्थिती दाखविण्यास सज्ज आहेत.
गेल्या २५ वर्षांपैकी २० वर्षांपासून आरा विधानसभा मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे. भोजपूर प्रदेशातील हा तोच भाग आहे जिथे २००० मध्ये भाजपने पहिली विधानसभा निवडणूक जिंकली होती. त्यानंतर अमरेंद्र प्रताप सिंह येथून सलग विजयी झाले आणि २०२० मध्ये त्यांनी पाचव्यांदा आरा येथून विजयी झाले. राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की पवन सिंह येथून निवडणूक लढवल्याने ही जागा आणखी मनोरंजक होईल.
भोजपूर प्रदेशात भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायक आणि अभिनेता पवन सिंह यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांनी सामान्य जनतेमध्ये विशेष स्थान निर्माण केले असून, राजकीय क्षेत्रात प्रवेश केल्यास पक्षाला, विशेषतः चित्रपट आणि स्टार पॉवरशी संबंधित मतदारांमध्ये, निवडणूक फायद्याची शक्यता दिसत आहे.
Bank Scam: फेरफार करून कृत्रिमरित्या वाढवल्या शेअर्सच्या किमती; खाजगी बँकेत २००० कोटींचा घोटाळा उघड
भोजपुरी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा राजकारणात सहभाग ही नवीन बाब नाही. यापूर्वी मनोज तिवारी, रवी किशन आणि निरहुआ यांसारखे कलाकार सक्रियपणे राजकारणात उतरले असून, त्यांच्या लोकप्रियतेचा निवडणूक निकालांवर महत्त्वाचा परिणाम दिसून आला आहे.
राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे की पवन सिंह यांची एनडीए उमेदवारी आरा विधानसभा मतदारसंघातील लढाई आणखी रोमांचक करेल. या जागेवर एनडीए आणि विरोधी पक्ष दोन्ही आपली संपूर्ण ताकद लावण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, पवन सिंह यांची उपेंद्र कुशवाहा यांच्याशी झालेली भेट आगामी विधानसभा निवडणुकीसंबंधी महत्त्वाचे संकेत देते.