नवी मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. वेश्याव्यवसाय सुरु असलेल्या स्पा सेंटरवर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १५ महिलांना मुक्त करण्यात आले आहे. या कारवाईत थायलंडमधील दोन तरुणींसह इतर महिलांचा समावेश असून स्पा सेंटरचा मालक आणि त्याचा सफाई कर्मचारी यांना पोलिसांनी अटक केली आहे.
नेपाळ, थायलंडच्या मुली…
हि कारवाई सीबीडी बेलापूर येथील मॅजिक मोमेंट वेलनेस स्पा या सेंटरवर करण्यात आली. या ठिकाणी धाड टाकून पोलिसांनी १५ महिलांची सुटका केली आहे. त्यात थायलंडमधील दोन, नेपाळमधील एक, दिल्ली व उत्तर प्रदेशातील प्रत्येकी दोन, पश्चिम बंगाल व गुजरातमधील प्रत्येकी एक तर महाराष्ट्रातील सहा महिलांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी स्पा मालक आणि त्याचा सफाई कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
कशी करण्यात आली कारवाई?
पोलिस आयुक्त भलिंद्र भारंबे यांनी अनैतिक व्यापार व अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी विशेष मोहिम सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना माहिती मिळाली की, बेलापूरमधील या स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालतो. माहिती खातरजमा करण्यासाठी पथकाने एका बनावट ग्राहकाला आत पाठवले. त्याने मिळवलेल्या पुराव्यांच्या आधारे शनिवारी संध्याकाळी छापा टाकण्यात आला.
जबरदस्तीने वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त
या छाप्यात पोलिसांना महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले जात असल्याचे समजले. स्पाचा मालक आणि सफाई कर्मचारी हे महिलांना मसाजसाठी बोलवून ग्राहकांना “विशेष सेवा” पुरवण्यास भाग पाडत असल्याचे उघड झाले. ग्राहकांकडून सहा हजार रुपये आकारले जात असल्याचेही समोर आले. सुटका केलेल्या महिलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे. दुसरीकडे, या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, पुण्यात देखील पोलिसांनी अशीच एक कारवाई केली आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी पुण्यातील सनशाईन स्पा सेंटरवर छापा टाकत हा प्रकार उघडकीस आला. या धाडीत पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तरूणाला घरी बोलावलं अन् नंतर गळा चिरून हत्या केली; झारखंडमधील धक्कादायक प्रकार समोर