File Photo : Parliament
शिमला : हिमाचल प्रदेशात राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार नाही. विरोधी पक्ष भाजपने मोठा डाव खेळत राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवार उभा केला आहे. भाजपने काँग्रेसमधून आलेल्या हर्ष महाजन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांचा सामना काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अभिषेक मनु सिंघवी यांच्याशी होणार आहे.
विधानसभेत काँग्रेसचे बहुमत असल्याने भाजप उमेदवार देणार नाही, असे मानले जात होते. 2022 च्या विधानसभा निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी हर्ष महाजन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. हर्ष महाजन हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिले आहेत. काँग्रेस सरकारमध्ये ते मंत्रीही राहिले आहेत. हर्ष महाजन हे माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांच्या जवळचे आहेत.
सध्या ते भाजप प्रदेश कोअर ग्रुपचे सदस्य आहेत. हर्ष महाजन यांना उमेदवार करून भाजपने काँग्रेसच्या असंतुष्ट आमदारांवर डोळा ठेवला आहे. काँग्रेसचे काही आमदार सरकारवर असमाधानी असून सरकारच्या कार्यशैलीवरही प्रश्न उपस्थित करत असल्याचे भाजपचे मत आहे. काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी हे राज्याबाहेरचे असल्याने भाजप हा मुद्दा बनवणार आहे.
अभिषेक मनु सिंघवी राज्यसभेचे उमेदवार बनल्याने राज्यसभेवर जाण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. अशा स्थितीत भाजपने उमेदवार उभे करून राज्यसभा निवडणूक अतिशय रंजक बनवली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा राज्यसभा खासदारपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली आहे.