भाजपाला नवा अध्यक्ष २१ जुलैपर्यंत (फोटो सौजन्य-X)
नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या. त्यानंतर विविध राज्यांत विधानसभा निवडणुकाही झाल्या आहेत. त्यानंतर आता भाजपच्या पुढील राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीची घोषणेकडे लक्ष लागले आहे. त्यानुसार, जोरदार तयारी केली जात आहे. असे असताना आता महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी अधिक काळ वाट पाहावी लागू शकते, असे आता सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुकीची गती मंदावल्याने आणि 21 ते 23 मार्च दरम्यान बंगळुरू येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीमुळे ही प्रक्रिया एप्रिलपर्यंत पुढे ढकलली जाऊ शकते. यापूर्वी अशी चर्चा होती की, राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा 14 मार्चनंतर केली जाऊ शकते. पण, आता पक्षाच्या सूत्रांनुसार अध्यक्षपदाच्या शर्यतीत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची नावे पुढे आहेत.
दरम्यान, बंगळुरू येथे होणाऱ्या या बैठकीला भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्यासह 1500 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे भाजप नेतृत्वाला नवीन अध्यक्षाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी 24 मार्चपर्यंत वाट पाहावी लागू शकते, अशी माहिती समोर आली आहे.
प्रदेशाध्यक्ष निवडीला होतोय विलंब
अर्ध्याहून अधिक राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या निवडीला विलंब होत आहे. परंतु आतापर्यंत ही प्रक्रिया फक्त 12 राज्यांमध्ये पूर्ण झाली आहे. केंद्रीय निरीक्षक पाठवणे आणि निवडणुका घेण्याची तारीख निश्चित करण्यासाठी 10-12 दिवस लागू शकतात.
अध्यक्ष निवडीचे निकष आहेत तरी काय?
सामान्यतः असे मानले जाते की, नवीन अध्यक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह पक्षाच्या सर्व वैचारिक घटकांना स्वीकारार्ह असावा. त्याला संघटनात्मक मूल्यांची सखोल समज असली पाहिजे. याव्यतिरिक्त, पक्ष जाती संतुलन, भाषा वाद, सीमांकन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तर प्रदेशात पक्षाचा पाया मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करेल. कारण लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या पराभवामुळे पक्षाला स्वबळावर बहुमत मिळण्यापासून वंचित ठेवले गेले.