कोण होणार भाजपचा अध्यक्ष? धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव यांच्या नावांवर RSS मध्ये एकमत नाही (फोटो सौजन्य-X)
Uttar Pradesh State President News In Marathi : भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? हा प्रश्न भगवा पक्षाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या तसेच राजकीय पंडितांच्या मनात घुमत आहे. या पदाबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजप नेतृत्वामध्ये या मुद्द्यावर एकमत झालेले नाही. अलीकडेच भाजप अध्यक्षपदासाठी दोन केंद्रीय मंत्र्यांची नावे आरएसएसकडे पाठवण्यात आली होती, परंतु त्यापैकी कोणत्याही नावावर एकमत होऊ शकले नाही. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव यांची नावे पाठवली होती. दोन्ही नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जवळचे मानले जातात, अशी माहिती आहे.
२०२९ नंतरच्या काळासाठी भाजपला तयार करणे आवश्यक आहे असे संघाचे मत आहे. संघ भाजपसाठी पुढील आणि नवीन पिढी तयार करू इच्छितो आहे. पण भाजपला रबर स्टॅम्प अध्यक्षाऐवजी एक मजबूत नेतृत्व मिळावे अशी आरएसएसची इच्छा आहे, ज्याला पक्षाचे कार्यकर्ते देखील पसंत करतात. नरेंद्र मोदींनंतर भाजपला हाताळण्यास सक्षम असावा. एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, “आरएसएस आणि भाजपच्या सध्याच्या नेतृत्वात तीन फेऱ्या झाल्यानंतरही एकमत झाले नाही. पुढील चर्चा होणार आहे.”, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
यापूर्वी बातम्या आल्या होत्या की, भाजप त्यांच्या इतिहासात प्रथमच एका महिला नेत्याकडे पक्षाची कमान सोपवू शकते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे नाव त्यांच्यामध्ये प्रमुख होते. याशिवाय आणखी दोन केंद्रीय मंत्र्यांची नावे या शर्यतीत होती, ज्यात मनोहर लाल खट्टर आणि शिवराज सिंह चौहान यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय अध्यक्षाच्या नावाच्या निवडीसोबतच देशातील सर्वात मोठ्या राज्य उत्तर प्रदेशच्या पुढील प्रदेशाध्यक्षाच्या नावाचे आव्हानही भाजपसमोर आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, उत्तर प्रदेशात भाजप अध्यक्षपदाच्या नियुक्तीवर अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्यात एकमत नाही. एकंदरित उत्तर प्रदेशचे अध्यक्ष कोण होणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची प्रतीक्षेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण पक्षाचे नेतृत्व सध्या उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, दिल्ली आणि हरियाणा या पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये राज्य युनिट प्रमुखांची निवड पूर्ण करण्यावर जोर देत आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षांचे नाव बाहेर येण्यास अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. पक्ष प्रथम या राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची निवड करेल आणि त्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्षांबाबत कोणताही निर्णय घेतला जाईल. बहुतेक राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या असल्या तरी, उत्तर प्रदेशसारख्या राज्यात प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती अद्याप प्रलंबित आहे.