नोएडात ‘बर्निंग कार’चा थरार; इंजिनियरसह दोघांचा होरपळून मृत्यू

नोएडा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने दोन तरुणांचा होरपळून मृत्यू झाला. मित्राच्या बर्थ डे पार्टीवरून परतत असताना ही दुर्घटना घडली आहे.

    नोएडा : नोएडा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने दोन तरुणांचा होरपळून मृत्यू झाला. मित्राच्या बर्थ डे पार्टीवरून परतत असताना ही दुर्घटना घडली आहे. विजय चौधरी आणि अनस अशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत.

    पोलिसांनुसार, विजय चौधरी हा सॉफ्टवेअर इंजिनियर तरुण मित्राच्या बर्थ डे पार्टीला जातो, असे सांगून आपल्या स्विफ्ट कारमधून शुक्रवारी रात्री घराबाहेर पडला होता. शुक्रवारी पार्टी केल्यानंतर शनिवारी सकाळी ते आम्रपाली प्लॅटिनियम या सोसायटीखाली आले आणि तिथे काही वेळासाठी थांबले. दोघेही कारमध्ये गप्पा मारत असताना अचानक कारने पेट घेतला. हा प्रकार लक्षात येताच सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने फोनद्वारे अग्निशमन दलाला माहिती दिली.

    या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी झाले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. विजय आणि त्याच्या मित्राला कारबाहेर पडण्याचीही संधी मिळाली नाही. काही क्षणांतच कार जळून खाक झाली आणि आतमध्ये असलेल्या दोघांचाही होरपळून मृत्यू झाला. आम्ही घटनास्थळी दाखल झालो तेव्हा आम्हाला कारमध्ये दोन तरुणांचे मृतदेह आढळले, अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीपकुमार चौबे यांनी दिली.

    दरम्यान, कारमधील एसी यंत्रणेत बिघाड होऊन शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळची वेळ असल्याने घटनेच्या वेळी रस्त्यावर फारसे लोक नव्हते.