राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात तणाव वाढत आहे. सचिन पायलट यांनी गुरुवारी (11 मे) पक्षाच्या भूमिकेपासून फारकत घेत जनसंघर्ष पदयात्रेला सुरुवात केली. त्यांच्या या निर्णयानंतर शुक्रवारी (१२ मे) दिल्लीत काँग्रेसची बैठक झाली.राजस्थान काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर रंधवा यांच्याशिवाय प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंद सिंग दोतासारा आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव काझी निजामुद्दीन, वीरेंद्र राठोड आणि राज्याचे सहप्रभारी अमृता धवन या बैठकीला उपस्थित होते.
बैठकीनंतर रंधावा म्हणाले की, ही पायलट यांची वैयक्तिक पदयात्रा आहे. ते म्हणाले, “आम्ही यात्रेवर लक्ष ठेवून आहोत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे कर्नाटकातून दिल्लीत परतल्यावर त्यांच्याशी याबाबत चर्चा करू. आम्ही आमचे म्हणणे त्यांच्यासमोर मांडू.
सचिन पायलटच्या पदयात्रेचा अर्थ
अशोक गेहलोत आणि काँग्रेस नेतृत्वावर दबाव टाकण्याचा प्रयत्न म्हणून सचिन पायलटच्या या निर्णयाकडे पाहिले जात आहे. वसुंधरा राजे यांच्या सरकारच्या काळात झालेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात गेहलोत यांनी गेल्या चार वर्षांत कोणतीही कारवाई केली नसल्याचे पायलट सातत्याने सांगत आहेत.
आपल्या पाच दिवसांच्या यात्रेचे वर्णन ‘भ्रष्टाचारविरोधी जनसंघर्ष पदयात्रा’ असे करताना पायलट म्हणतात की, ‘आवाज उठवा आणि जनतेचा आवाज व्हा’ यासाठी ही यात्रा काढण्यात येत आहे. राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका आहेत, त्यामुळे अशा परिस्थितीत पायलट आणि गेहलोत यांच्यातील खडाजंगीमुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
अलिकडच्या काळात पायलट आणि गेहलोत यांच्यातील शाब्दिक युद्ध तीव्र झाले आहे. आमच्याविरोधात बंड करून आमदारांनी भाजपकडून पैसे घेतल्याचे गेहलोत एकीकडे सांगत आहेत. यावर उत्तर देताना पायलटने हा आरोप खोटा असल्याचे सांगितले होते.