संदीप दिक्षित यांची केजरीवाल यांच्यावर टीका (फोटो- सोशल मिडिया)
Delhi Assembly Election: दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. 5 तारखेला मतदान आणि 8 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. प्रचार शिगेला पोहोचला आहे. कॉँग्रेस, आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यात थेट लढत होत आहे. इंडिया आघाडीमध्ये एकत्रित असणारे कॉँग्रेस आणि आम आदमी पक्ष दिल्लीची निवडणूक स्वबळावर लढत आहेत. दरम्यान निवडणुक जसजशी जवळ येत आहे, तसे आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कॉँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.
दिल्ली विधानसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. नवी दिल्ली मतदारसंघाचे कॉँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांनी केजरीवालांना खुले आव्हान दिले आहे. 31 जानेवारी रोजी जंतर-मंतर मैदानावर सार्वजनिकरीत्या चर्चेचे आव्हान दिले आहे. संदीप दीक्षित यांनी अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे. संदीप दीक्षित हे कॉँग्रेसचे नवी दिल्लीचे उमेदवार आहेत.
कॉँग्रेसचे संदीप दीक्षित यांना उमेदवारी घोषित झाल्यापासून ते केजरीवालांवर टीका करत आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करताना संदीप दीक्षित म्हणाले, “मला माहिती आहे की अरविंद केजरीवाल यांच्यात खरेपणाचा सामना करण्याची हिंमतच नाहीये आणि ते कधी हिंमत करणारही नाहीत. 31 जानेवारी रोजी दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास ही चर्चा सार्वजनिकरित्या होईल. मला आशा आहे की, तुम्ही स्वतः या प्रश्नांची उत्तरे द्याल किंवा एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात किंवा अशा वादविवादात द्याल जिथे आपण एकाच व्यासपीठावर एकत्र येऊ शकतो.”
नवी दिल्ली मतदारसंघातील निवडणूक चुरशीची झाली आहे. अरविंद केजरीवाल या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर संदीप दीक्षित हे कॉँग्रेसकडून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. तर भाजपने या जागेवर प्रवेश शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. तिरंगी लढत या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यासाठी ही निवडणूक करो किंवा मरो अशी असणार आहे.
यमुनेत विष मिसळल्याचे वक्तव्य भोवलं; केजरीवालांच्या अडचणी वाढल्या
दिल्ली विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार शिगेला पोहोचला आहे. 5 तारखेला मतदान आणि 8 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. मात्र माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होताना पहायला मिळत आहे. प्रचारादरम्यान केजरीवाल यांनी यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा गंभीर आरोप केला होता. हा आरोप आता त्यांना भोवण्याची शक्यता आहे. हरियाणा सरकारने केजरीवालांविरोधात खटला दाखल केला आहे. या प्रकरणात सोनीपत कोर्टाने केजरीवाल यांना नोटिस धाडली आहे.
काय म्हणाले होते अरविंद केजरीवाल?
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाच्या भाजप सरकारने यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केला होता. त्यांनी म्हटले होते की हरियाणाचे पाणी यमुनेतून दिल्लीला येते. भाजपच्या हरियाणा सरकारने यमुनेचे पाणी विषारी बनवले आहे. तथापि, दिल्ली जल बोर्डाने ते पाणी दिल्लीत येण्यापासून रोखले. भाजप सरकारने पाण्यात असे विष मिसळले आहे, जे जलशुद्धीकरण केंद्रांनीही स्वच्छ करता येत नाही. यामुळे दिल्लीच्या एक तृतीयांश भागात पाण्याची कमतरता आहे.