कॉंग्रेससाठी कशी असेल यंदाची दिल्लीची निवडणूक? आप-भाजपसमोर निभाव लागणार का? काय सांगतात २०२० चे आकडे? वाचा सविस्तर
कॉंग्रेसने तब्बल १५ वर्ष दिल्लीवर सत्ता गाजवली, मात्र २०१० नंतर कॉंग्रेसची अस्तित्वासाठी लढाई सुरू आहे. १९९८ ते २०१३ पर्यंत दिल्लीत काँग्रेस सत्तेत होती, मात्र अरविंद केजरीवाल यांच्या राजकीय उदयानंतर काँग्रेसचा सुपडासाफ झाला. २०१५ आणि २०२० मध्ये भोपळाही फोडता न आलेल्या कॉंग्रेसचा ही निवडणूक तिरंगी करण्याचा प्रयत्न सुरू असून राहुल गांधींनीही आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. गेल्या १० वर्षात गेलेली पत आणि दिल्लीत पुन्हा पाय रोवण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या बड्या नेत्यांविरुद्ध काँग्रेसने केवळ मजबूत उमेदवार उभे केले नाहीत तर केजरीवाल यांच्याविरुद्ध आक्रमक प्रचारही करताना दिसत आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी प्रचारात उतरला आहे. काँग्रेसने अनेक मोठ्या नेत्यांना उमेदवारी देऊन निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. पक्षाची ही एक विचारपूर्वक केलेली रणनीती आहे, भविष्यात भाजपशी थेट स्पर्धा करायची असेल तर ज्या पक्षाच्या उदयामुळे दिल्लीत काँग्रेसचं नुकसान झालं आहे त्या पक्षाला पराभूत करणं आवश्यक आहे. मात्र तरीही कॉंग्रेसला ही निवडणूक सोपी असणार नाही. नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध माजी खासदार संदीप दीक्षित आणि कालकाजी मतदारसंघातून आतिशी यांच्याविरुद्ध अलका लांबा यांना उमेदवारी देऊन काँग्रेस भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यातील लढत तिरंगी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
एकेकाळी दिल्लीत काँग्रेसचं दिल्लीत ४५ टक्के मतदान होतं. पण सध्या ४ टक्क्यांपर्यंत मतदानाचा टक्का घसरला आहे. एवढंच नाही तर दिल्लीतील काँग्रेसचा राजकीय आधार असलेले मुस्लिम, दलित, पंजाबी, ब्राह्मण आणि शीख मते आम आदमी पक्षाची मतपेढी बनली आहेत. २०१५ आणि २०२० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दिल्लीत खातेही उघडता आलं नव्हतं.
अरविंद केजरीवाल यांच्या लोकप्रियतेसमोर गेल्या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. २०२० मध्ये, सर्वात मोठे नुकसान काँग्रेसचे झाले. १९९८ ते २०१३ पर्यंत दिल्लीतील जनतेने पाठिंबा दिला होता. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी युती करून निवडणूक लढवली होती. काँग्रेसने ६६ जागांवर आपले नशीब आजमावले होते तर राजदने चार जागांवर निवडणूक लढवली होती.
२०२० च्या निवडणुकीत, ६६ जागा लढवूनही, काँग्रेस एकाही जागेवर दुसऱ्या क्रमांकावर आली नाही. फक्त गांधी नगर, देवळी आणि कस्तुरबा नगर या तीन जागांवरच त्यांची अनामत रक्कम वाचवता आली. अरविंदर लवली यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते गांधीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, तर देवळी मतदारसंघातून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव निवडणूक लढवत आहेत. त्याचप्रमाणे अभिषेक दत्त कस्तुरबानगरमधून निवडणूक लढवत आहेत.
गांधी नगर, देवळी आणि कस्तुरबा नगर या तीन जागांवर काँग्रेसला २० हजारांहून अधिक मते मिळाली होती. तर पक्षाच्या पाच उमेदवारांना दहा हजार ते वीस हजार मते मिळाली. २० जागांवर काँग्रेसला ५ हजार ते १० हजार मते मिळाली. तर, काँग्रेसच्या ३८ उमेदवारांना पाच हजारांपेक्षा कमी मते मिळाली. दिल्लीतील ज्या जागांवर काँग्रेसचं पूर्वी वर्चस्व होतं, त्या जागांवर डिपॉझिटही वाचवता आलं नाही.
१९९८ मध्ये ४७.७५ टक्के मते आणि ५२ जागांसह सत्ता मिळवून तीनदा विजय मिळवणाऱ्या काँग्रेसला २०१३ मध्ये केवळ २४.६ टक्के मतं आणि आठ जागांवर समाधान मानावं लागलं. यानंतर २०१५ मध्ये ९.७ टक्के आणि २०२० मध्ये ४.२६ टक्के मिळवता आली. दिल्लीत काँग्रेस जितक्या वेगाने मागे पडत गेली, तितक्या वेगाने आम आदमी पक्षाचा आलेख वर चढत गेला. २०१३ मध्ये आम आदमी पक्षाला २९.५ टक्के मते मिळाली होती, तर २०१५ मध्ये ५४.३ टक्के मते मिळवून ६७ जागांवर विजय मिळवला. तर २०२० मध्ये ५३.५७ टक्के मतांसह ६२ जागा जिंकण्यात यश आलं. काँग्रेसच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्यात आत अरविंद केजरीवाल यांचं राज्य आहे.
राहुल गांधी यांनी केजरीवाल यांच्या दिल्ली मॉडेलवर हल्ला चढवल्यानंतर काँग्रेसने दिल्ली निवडणूक प्रचारात मुसंडी मारली. त्यानंतर त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनेक सभा रद्द करण्यात आल्या. राहुल गांधी आता दिल्लीत पुन्हा सक्रिय झाले आहेत आणि त्यांनी अनेक मुस्लिम आणि दलितबहुल भागात सभा घेऊन वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसने दलित आणि मुस्लिम बहुल जागांवर लक्ष केंद्रित केलं आहे, परंतु असदुद्दीन ओवैसी यांनी दोन जागांवर आपले उमेदवार उभे करून कॉंग्रेसचा संपूर्ण खेळ बिघडवला आहे.
भाजप आणि आम आदमी पक्षामध्येच थेट सामना होण्याची शक्यता आहे. मुस्लिम बहुल जागांवरील काँग्रेसची रणनिती आणखी बिघडत चालली आहे. जर दिल्लीत काँग्रेस सरकार स्थापन झालं तर त्याचा मतदारांना काही उपयोग होणार नाही, असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आपचे उमेदवार करत आहेत. दिल्लीत भाजप किंवा आम आदमी पक्ष सरकार स्थापन करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे, त्यामुळे मुस्लिम मतदार आम आदमी पक्षाकडे झुकताना दिसत आहेत.
दिल्लीत पुन्हा त्याच जोमात उभे राहण्यासाठी काँग्रेसला मतांचा टक्का वाढवावा लागेल. मात्र २०२० मध्ये कॉंग्रेसला जी मतं मिळाली आहेत, ती पाहता ही निवडणूक कठीण असण्याची शक्यता आहे. यावेळी, आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यातील स्पर्धेत, काँग्रेस दिल्लीत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी निवडणूक लढत आहे. अशा परिस्थितीत दिल्लीच्या राजकारणात कॉंग्रेसला ही निवडणूक तितकी सोपी असणार नाही.