केरळ : लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन मतदारसंघामधून निवडणूक लढवली होती. एक वायनाड आणि दुसरा रायबरेली मतदारसंघामधून राहुल गांधी यांनी निवडणूक लढवली होती. दोन्ही मतदारसंघामधून राहुल गांधी यांचा विजय झाला आहे. वायनाडमधून राहुल गांधी दुसऱ्यांदा लोकसभा जिंकले आहेत. तसेच 4 लाखांच्या मताधिक्यांनी विजय मिळवला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड येथे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेचे आभार मानले आणि कुठल्या मतदारसंघाची निवड करायची असा प्रश्न राहुल गांधी यांनी थेट जनतेला विचारला.
या सभेवेळी राहुल गांधी म्हणाले, मी द्विधा मनस्थितीत आहे, मी काय निवडू? रायबरेली की वायनाड? राहुल गांधींचा प्रश्न संपल्यावर उपस्थित असलेल्या लोकांनी एका सुरात उत्तर वायनाड असे उत्तर दिले. त्यानंतर राहुल गांधी म्हणाले, मला तुम्हाला सांगतो की, माझ्या निर्णयावर वायनाड आणि रायबरेली दोन्ही मतदारसंघातील लोकं खूश होतील. मी वचन देतो. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद आणि मी लवकरच तुम्हाला पुन्हा भेटेन. असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले. त्यामुळे आता राहुल गांधी कोणत्या मतदारसंघाची निवड करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
My dilemma is whether I should be MP of Wayanad or Rae Bareli: Rahul Gandhi in Kerala
— Press Trust of India (@PTI_News) June 12, 2024
राहुल गांधी यांचा दुहेरी विजयी
राहुल गांधींनी यावर्षी उत्तर प्रदेश मधील रायबरेली या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली. या जागेवर त्यांच्याविरोधात भाजप उमेदवार दिनेश प्रताप सिंह उभे होते. त्यांचा राहुल गांधी यांनी तब्बल 3 लाख 90 हजार 030 मतांनी पराभव केला होता. तर वायनाडमध्ये राहुल गांधींनी सीपीआय(एम)च्या ॲनी राजा यांचा पराभव केला आहे. यापूर्वी देखील 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही राहुल गांधी यांनी दोन जागांवर निवडणूक लढवली होती, पण अमेठीमध्ये त्यांचा स्मृती इराणींनी पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीत राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड या दोन्ही जागांवर विजयी झाले आहेत.