बंगळुरु : आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे (Karnataka Assembly Election) बिगूल वाजले आहे. त्यानुसार, 10 मे रोजी मतदान होणार असून, या निवडणुकीचे निकाल 13 मे रोजी जाहीर केले जाणार आहेत. पण या निवडणुकीत कर्नाटकात काँग्रेसला अधिक जागा मिळतील, असा कल एक्झिट पोलच्या (Exit Poll) माध्यमातून लावला जात आहे. असे असल्याने भाजप आता तयारीनिशी मैदानात उतरला आहे.
भाजपने ही निवडणूक जिंकण्यासाठी रणनिती आखली आहे. त्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची कर्नाटकातील विविध जिल्ह्यांत सभा होणार आहे. त्यांचा सहा दिवस कर्नाटकात दौरा असणार आहे. यामध्ये जवळपास 15 जाहीरसभा आणि रोड शो ते करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह इतर प्रमुख नेते निवडणूक प्रचारात उतरणार आहेत. पंतप्रधान मोदी 28 एप्रिल म्हणजे येत्या शुक्रवारी निवडणूक प्रचाराला सुरुवात करतील आणि हा प्रचार 7 मेपर्यंत चालणार आहे.
कर्नाटकात पंतप्रधानांचा दौरा वाढला
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारापूर्वीच त्यांचा दौरा वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारापूर्वी आठ वेळा कर्नाटकचा दौरा केला. त्यांनी भाजपच्या राज्यव्यापी ‘विजय संकल्प यात्रे’च्या समारोपाच्या निमित्ताने 25 मार्च रोजी कर्नाटकातील दावणगिरी येथे उपस्थित होते. त्यात रोड शोनंतर जाहीरसभेत त्यांचे भाषणही झाले होते.
बेळगावातून करणार प्रचाराला सुरुवात
पंतप्रधान मोदी आपल्या प्रचाराची सुरुवात बेळगावमधून करणार आहेत. कर्नाटकातील सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक असलेल्या बेळगावातील चिक्कोडी, कित्तूर आणि कुडाचीला ते भेट देणार आहेत. याशिवाय, पंतप्रधान उत्तर कन्नड जिल्ह्यालाही भेट देणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.