नवी दिल्ली – पुढील महिन्यात होणाऱ्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी निवडणूक प्रक्रियेत मोठे बदल करण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतला आहे. काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले की, निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केलेल्या सर्व पक्षाच्या नेत्यांना इलेक्टोरल कॉलेजमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व ९. हजार प्रतिनिधींची यादी पाहण्यास मिळेल. ही यादी २० सप्टेंबरपासून पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाकडे उपलब्ध होईल.
शशी थरूर, कार्ती चिदंबरम, मनीष तिवारी यांच्यासह पाच काँग्रेस खासदारांनी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना पत्र लिहून निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी केली होती. त्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने हा निर्णय घेतला आहे.
अलीकडच्या काही दिवसांत काँग्रेसमधून अनेक बड्या नेत्यांनी राजीनामे दिले आहेत, अशा स्थितीत उर्वरित नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्ष हायकमांडने हे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक १७ ऑक्टोबरला होणार आहे. यासाठी २४ ते ३० सप्टेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.