अयोध्या येथील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी (Photo Credit : Social media)
अयोध्या : रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येच्या विकासातील भ्रष्टाचाराची प्रकरणे हळूहळू उजेडात येत आहे. काही दिवसांपूर्वी राममंदिराच्या छतातून पाण गळत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात मोठी खडाजंगीही झाली, आरोप प्रत्यारोपांच्य फैरीही झ़डल्या. त्यानंतर राममंदिर प्रशासनावर अनेक प्रश्नचिन्हही उपस्थित होऊ लागले. पण यानंतरही अयोध्या विकासकामातील भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येतच आहेत.
अयोध्येतील रामपथ कोसळला, नंतर अयोध्येतील रस्त्यांच्या सुशोभिकरणासाठी खर्च केलेले कोट्यवधी रुपयांचे खांबही पडू लागले. शहराला राममय करण्यासाठी लावण्यात आलेले सजावटीचे दिवे चोरीला गेले. या शहराच्या विकासातील भ्रष्टाचाराची प्रकरणे इथेच थांबत नाहीत, सुरुवातीपासून मोजली तर यादी बरीच मोठी आहे. नुकतीच एक घटना घडल्याने अयोध्या महानगरपालिकेतील वातावरणही चांगलेच तापले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अयोध्येत रामल्लांच्या भव्य मंदिराचा मार्ग खुला झाला. त्यानंतर अयोध्या विकासासाठी अनेक योजनाही आणल्या गेल्या. पण यात अनेकदा भ्रष्टाचाराचेही आरोप झाले. या सर्व योजना आता अयोध्या महापालिकेत सातत्याने चर्चेचा विषय ठरत आहेत. असे असतानाही आजपर्यंत कोणत्याही योजनेबाबत ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या गर्भगृहाचे उद् घाटन करण्यात आले. पण पहिल्याच पावसात राम मंदिराच्या छतातून पाणी टपकू लागले. पावसाचे पाणी मंदिराच्या गर्भगृहाजवळही पोहोचले होते. हा मुद्दा मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याने उपस्थित केला आणि या मुद्द्यावरून बरेच राजकारण झाले. या पावसात राम मंदिरापासून मुख्य रस्त्याला जोडणारा रामपथही खचला. याबाबत अयोध्या महापालिकेच्या अनेक नगरसेवकांनी एका विशिष्ट कंपनीचे नाव घेऊन भ्रष्टाचाराचे आरोप केले.
अयोध्या धामच्या नगरसेवकांनी 74 कोटी रुपयांच्या सजावटीच्या दिव्यांच्या खरेदी प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सर्व आरोपांकडे दुर्लक्ष करून या प्रकल्पाचे काम सुरू केले. आता अयोध्या धाम येथील दिवेही चोरीला गेल्याची बातमी आली आहे. याच क्रमवारीत अयोध्या विकास प्राधिकरणात 30 कोटी रुपयांच्या आर्थिक अनियमिततेचे प्रकरणही समोर आले आहे. आता रामपथावर लावलेल्या दिव्यांच्या चोरीप्रकरणी महापालिकेने गुन्हा दाखल केला आहे.
अयोध्या धाममध्ये 74 कोटी रुपयांचे सजावटीचे दिवे लावण्यात आल्याचा आरोप अयोध्या महापालिकेच्या नगरसेवकांकडून करण्यात आला होता. या दिव्यांच्या निकृष्ट दर्जाची तक्रारही सर्व नगरसेवकांनी महापालिका आयुक्त संतोष शर्मा यांच्याकडे केली होती. अयोध्या धाममध्ये लावण्यात आलेले बहुतांश पय़दिवे हे वर्षभरातच खराब झाल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. इतकेच नव्हे तर रस्त्यावर बसवण्यात आलेले दिव्यांचे खांबही तुटून पडत असल्याने या दिव्यांची गुणवत्ता तपासून आठवडाभरात अपूर्ण कामे पूर्ण करण्याची मागणी नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती.
शहरात 76 कोटी रुपये खर्चून लावलेले सजावटीचे दिवे सहा महिन्यांतच पडू लागल्याची तक्रार नगरसेवकांनी केली आहे. पण प्रकल्प अपूर्ण असतानाच हे सजावटीचे दिवे कोसळू लागल्याने स्थानिकांकडून या कामातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहे. धक्कादायक म्हणजे हा प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी महिनाभर आधीच संपला आहे. पण तरीही या प्रकल्पासाठी महापालिकेने निवडलेल्या एकाही फर्मने पूर्णत्व प्रमाणपत्रासाठी अद्याप अर्ज केलेला नाही.