सुरक्षा दलांची नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई (फोटो- ani)
मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपूर्णपणे नष्ट करण्याचे केंद्र सरकारचे ध्येय
आंध्र प्रदेश ओडीशा सीमेवर सुरक्षा दलांची मोठी कामगिरी
50 पेक्षा जास्त नक्षलवादी ताब्यात
केंद्र सरकारने मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपूर्णपणे नष्ट करण्याचे ध्येय ठेवले आहे. शरण या किंवा मारले जा असे दोनच पर्याय सरकारने नक्षलवाद्यांच्यासमोर ठेवले आहेत. सुरक्षा दलांनी आपली कारवाई तीव्र केली आहे. दरम्यान आंध्र प्रदेश आणि ओडीशा राज्याच्या सीमेवर पुन्हा काही नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे. 50 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आंध्र प्रदेश आणि ओडीशा राज्यांच्या सीमावर्ती भागांत सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात सर्वात मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात घुसून ही कारवाई करण्यात आली. सुरक्षा दलांनी रचलेल्या सापळ्यात 50 नक्षलवादी अडकले. तर 7 नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश आले.
या कारवाईत टॉप कमांडर देवजी आणि टेक्निकल एक्स्पर्ट शंकर यांना ठार मारण्यात आले. सीमावर्ती भागातील घनदाट जंगलात ही ऑपरेशन राबवले गेले. गेल्या काही दिवसांत सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात आपली कारवाई अधिक तीव्र केली आहे. या ठिकाणी नक्षलवादी आपले आश्रयस्थान तयार करत असल्याची माहिती मिळताच या परिसराला वेढा घालण्यात आला, त्यानंतर ही कारवाई केली गेली.
टॉप नक्षल कमांडर हिडमा ठार
छत्तीसगड-आंध्र प्रदेश सीमेवरील अल्लुरी सीताराम जिल्ह्यातील जंगलात एक मोठी चकमक झाल्याची माहिती मिळाली. ग्रेहाउंड्स जवानांनी केलेल्या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांची नक्षलवादी कार्यकर्त्यांशी चकमक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, काही वरिष्ठ कार्यकर्त्यांसह सहा नक्षलवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दल या भागात शोधमोहीम सुरू ठेवत आहेत. दरम्यान, कुख्यात नक्षलवादी कमांडर माडवी हिडमा (४३) याला सुरक्षा दलांनी ठार मारले आहे. २०१३ च्या दरभा व्हॅली हत्याकांड आणि २०१७ च्या सुकमा हल्ल्यासह हिडमा किमान २६ सशस्त्र हल्ल्यांसाठी जबाबदार होता.
एराबोर पोलीस स्टेशन परिसरातील जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये अधूनमधून गोळीबार सुरू आहे. नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. या चकमकीत सहा माओवादी ठार झाल्याची पुष्टी झाली आहे, ज्यात एका वरिष्ठ माओवादी नेत्याचा समावेश आहे. सुरक्षा दल घटनास्थळी शोध मोहीम राबवत आहेत आणि आजूबाजूच्या घनदाट जंगलात शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश-छत्तीसगड–ओडिशा सीमावर्ती भागात माओवादी कारवायांमध्ये अलिकडेच वाढ झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही मोहीम तीव्र केली. राज्याचे डीजीपी हरीश कुमार गुप्ता परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि ही मोहीम सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.






