संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले मोठे विधान (Photo Credit- X)
Rajnath Singh: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘हैदराबाद मुक्ती दिन’ कार्यक्रमात दहशतवादावर मोठे विधान केले. कोणताही हस्तक्षेपामुळे दहशतवादाविरुद्धची कारवाई थांबवण्यात आलेली नाही, असे स्पष्ट करताना त्यांनी भविष्यात पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्यास ‘ऑपरेशन सिंदूर’ पुन्हा सुरू केले जाईल, असा इशारा दिला.
राजनाथ सिंह यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव न घेता, ‘काही लोक भारत-पाकिस्तानमधील संघर्ष थांबवल्याचा दावा करतात, परंतु कोणीही तसे केलेले नाही,’ असे म्हटले. त्यांनी पुढे सांगितले की, खुद्द पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांनीच भारताने या प्रकरणात कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका नाकारल्याचे स्पष्ट केले आहे.
VIDEO | Hyderabad: Speaking during the Hyderabad Liberation Day celebrations, Defence Minister Rajnath Singh (@rajnathsingh) says, “Terror attack in Pahalgam, like the Razakars, was a crushing strike on India’s social harmony.”#PahalgamAttack #HyderabadLiberationDay
(Full… pic.twitter.com/E4vQLe6uxG
— Press Trust of India (@PTI_News) September 17, 2025
मागील काही वर्षांपासून डोनाल्ड ट्रम्प यांनी, पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संघर्षात आपण मध्यस्थी केल्याचा दावा अनेकदा केला होता. मात्र, भारताने हा दावा वारंवार फेटाळून लावला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनीही नुकताच ट्रम्प यांच्या दाव्याचा पर्दाफाश केला, आणि भारताने युद्धबंदीत कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी स्वीकारली नसल्याचे म्हटले.
हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त बोलताना राजनाथ सिंह यांनी ‘ऑपरेशन पोलो’ ची आठवण काढली. ते म्हणाले की, रझाकारांचा दहशतवाद पहलगाममधील हल्ल्याप्रमाणेच होता, जिथे लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारून मारले जात असे. आजही देशात रझाकारांचे सहानुभूतीदार अस्तित्वात आहेत, आणि ते आपले सर्वात मोठे शत्रू आहेत. आम्ही भारतातून ही विचारसरणी आणि मानसिकता पूर्णपणे नष्ट करण्याचा निर्धार केला आहे, कारण भारताची अखंडता आणि एकता यापेक्षा मोठे कोणतेही मूल्य नाही.
राजनाथ सिंह म्हणाले की, सरदार पटेल यांनी त्यांच्या राजकीय परिपक्वता आणि कुशल रणनीतीमुळे संस्थानांचे भारतात शांततेने एकीकरण केले. सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या ‘ऑपरेशन पोलो’च्या विजयाचा आज वर्धापन दिन आहे. आजचा भारत कोणत्याही शत्रूचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम आहे.