राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला इशारा (फोटो- संसद टीव्ही)
नवी दिल्ली/Rajnath Singh/Parliament Live: सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सनदेत भारत सरकारने आणि लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत सभागृहाला माहिती दिली. यावेळी त्यांनी भारतीय सैन्य दलांचे कौतुक केले. तर विरोधकांना देखील चांगलेच सुनावले आहे. तसेच ऑपरेशन सिंदूर थांबवले आहे, बंद केलेले नाही असेही त्यांनी सभागृहात स्पष्ट केले आहे.
संसदेत ऑपरेशन सिंदूरवर बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये दहशतवादाचा सामना करण्यासाठी तयार आहोत. भारत आपल्या आत्मरक्षणासाठी सदैव तयार आहे. जर कोणी आमच्या नागरिकांना मारणार असेल तर, आमच्या मिसाईल्स सीमा पार करणारच. आमचे सैनिक शत्रू राष्ट्रात घुसून कारवाई करणारच. आम्ही दहशतवादाचा पूर्णपणे बिमोड करण्यासाठी पूर्णपणे तत्पर आहोत.”
पुढे बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ” आम्ही पाकिस्तानच्या दबावाखाली युद्धबंदी केलेली नाही. ऑपरेशन सिंदूर थांबवले आहे, बंद केलेलं नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले आहेत. संपूर्ण ऑपरेशन आम्ही २२ मिनिटात पूर्ण केले आहे. ऑपरेशन सिंदूर हे भारताचे यश आहे. तीनही सैन्य दलांनी एकत्रितपणे ही कारवाई केली आहे.”
“आम्ही केलेली कारवाई ही पूर्णपणे आमच्या संरक्षणासाठी केलेली होती. ती चिथावणीखोर कारवाई नव्हती. पाकिस्तानने इलेक्ट्रॉनिक युद्धाचा वापर केला. त्यांच्या निशाण्यावर आपली अनेक विमानतळे आणि महत्वाची साधने होती. मात्र आपल्या सैन्य दलांनी पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला यशस्वीपणे उधळून लावला आहे.
“आम्ही दशतवादाला मुळापासून संपवण्याचा निर्धार केला आहे. आम्ही राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे उध्वस्त केले आहेत. १०० पेक्षा जास्त दहशतवादी आणि हँडलर्स मारले गेले. भारत कोणत्याही अवस्त्र युद्धाच्या भीतीला भीक घालणार नाही. दहशतवादाचा बिमोड केला जाणारच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्य दलांना कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. पहलगाममधील हल्ल्यात धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या. हे घृणास्पद आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.
“१० मे रोजी पाकिस्तानवर भारतीय हवाई दलाने हल्ला केला. १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार मारले आहे. त्यानंतर पाकिस्तानकडून हल्ले थांबवण्याची विनंती करण्यात आली होती. त्यामुळे आम्ही ऑपरेशन सिंदूर केवळ थांबवले आहे, ते पूर्णपणे बंद केलेले नाही. पाकिस्तानने पुन्हा भारताची कुरापत काढण्याचा प्रयत्न केला तर, ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु केला जाईल, असे स्पष्टपणे राजनाथ सिंह यांनी संसदेतील चर्चेत स्पष्ट केले आहे.