रेखा गुप्तांच्या मंत्रिमंडळात कोणाची लागली वर्णी? त्या ६ नव्या चेहऱ्यांची देशभर चर्चा
विद्यार्थीदशेपासून राजकारणात सक्रीय असलेल्या रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची आज शपथ घेतली. रामलीला मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. रेखा गुप्ता यांच्यासह सहा नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे अनुभवी नेते आणि दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार मानले गेलेल्या प्रवेश वर्मा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला भाजपच्या अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती.
तब्बल २९ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर भाजपला दिल्लीत पुन्हा सत्ता मिळाली आहे. पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या रेखा शर्मा यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत. याआधी भाजपच्या सुषमा स्वराज, कॉंग्रेसच्या शिला दीक्षित आणि आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे. रेखा गुप्ता यांच्यासोबत सहा जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
रेखा गुप्ता यांच्या मंत्रिमंडळातील ६ नवे चेहरे
आमदार प्रवेश वर्मा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे पुत्र आहेत.
आमदार कपिल मिश्रा. ते दिल्ली महानगरपालिकेच्या माजी महापौर अन्नपूर्णा मिश्रा यांचा चिरंजीव आहेत
आमदार रवींद्र सिंह. हे भाजप एससी मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत.
आमदार आशिष सूद. हे दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत.
आमदार मनजिंदर सिंह सिरसा. हे शीख गुरूद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देखील आहेत.
आमदार पंकज कुमार सिंह. हे मुळचे बिहारचे आहेत. पूर्वांचल राजपूत हे विकासपुरीमधून पहिल्यांदाच आमदार झाले आहेत.
या सहा आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी यमुना नदीच्या काठावरील वासुदेव घाटावर यमुना आरती केली. यमुना नदीची स्वच्छता भाजपच्या प्राधान्यात समाविष्ट आहे आणि या आरतीद्वारे नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की भाजप सरकार दिल्लीतील यमुना स्वच्छ करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.
सचिवालयात मंत्रिमंडळाची बैठक
मुख्यमंत्र्यांनी येथे यमुना आरतीही केली. यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट असलेले मंत्रीही उपस्थित होते. घाटावरील आरतीनंतर, सर्वजण सचिवालयाकडे रवाना झाले, जिथे नवनिर्वाचित मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. दिल्ली मंत्रिमंडळातील नवीन मंत्रीही यमुनेला भेट देण्यासाठी आले होते. भाजपच्या जाहीरनाम्यात यमुनेची स्वच्छता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता आणि यावेळी यमुनेचे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात निवडणुकीचा मुद्दा बनला. अशा परिस्थितीत, मुख्यमंत्र्यांनी प्रथम यमुना नदीच्या घाटाला भेट देणे आणि यमुना आरतीमध्ये सहभागी होणे हे दिल्लीतील यमुना स्वच्छता मोहिमेच्या एका नवीन टप्प्याची सुरुवात दर्शवत आहे.