दिल्ली विमानतळावर जीपीएस सिग्नलची छेडछाड: ८०० हून अधिक उड्डाणे विस्कळीत एअर ट्रॅफिक कंट्रोल
Delhi Airport IGI Airport Update: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन दिवसांपूर्वी म्हणजे ६ आणि ७ नोव्हेंबरला दिल्ली विमानतळावरील ८०० हूनअधिक विमाने विस्कळीत झाली होती. या संदर्भात एक मोठा खुलासा समोर आला आहे. या प्रकरणाचा तपास केला असता विमानतळावरील जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम) सिग्नलशी छेडछाड करण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
६ ते ७ नोव्हेंबरच्या संध्याकाळच्या दरम्यान, दिल्ली विमानतळावरील वैमानिकांना बनावट जीपीएस सिग्नल मिळत होते. या बनावट सिग्नलमुळे कॉकपिट स्क्रीनवर विमानाची स्थिती बदलली आणि एक खोटी प्रतिमा दिसू लागले. यामुळे वैमानिकांना धावपट्टीऐवजी शेतीसारखे दृश्य दिसू लागले. त्यातच विमानाच्या उंचीबद्दल गोंधळ निर्माण झाला. ६ नोव्हेंबरच्या संध्याकाळी सुरू झालेला हा बिघाड ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता ही प्रणाली पूर्णपणे बिघडली.
मोठा अपघात टळला
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, वैमानिकांनी जीपीएस-आधारित स्वयंचलित संदेशन ऐवजी मॅन्युअल पोझिशनिंगकडे स्विच करण्यात आली. जीपीएस छेडछाडीमुळे एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) ला संदेश पोहोचण्यासही विलंब झाला. वाढत्या हवाई वाहतुकीमुळे, हवाई क्षेत्रात विमानांमधील अंतर वाढले, ज्यामुळे मोठा अपघात टळला. अनेक विमाने दिल्ली विमानतळावर उतरण्याऐवजी जयपूर आणि जवळच्या विमानतळांवर वळवण्यात आली.
एएमएसएस बिघाडामुळे १२ तास ऑपरेशनवर परिणाम
जीपीएस छेडछाडीव्यतिरिक्त, आयजीआय येथील एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) ऑटोमॅटिक मेसेज स्विच सिस्टम (AMSS) मध्ये ७ नोव्हेंबर रोजी तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे १२ तासांपेक्षा जास्त काळ उड्डाण ऑपरेशन विस्कळीत झाले होते. AMSS ही एक संगणक नेटवर्क सिस्टम आहे जी विमान योजना, मार्ग, उंची आणि हवामान माहिती वैमानिक, ग्राउंड स्टाफ आणि इतर विमानतळांना रिअल-टाइममध्ये प्रसारित करते. जेव्हा या प्रक्रियेत बिघाड होतो. तेव्हा अपडेट मॅन्युअली करावे लागतात, ज्यामुळे कामाचा ताण आणि विलंब वाढतो. या घटनेमुळे, ८०० हून अधिक उड्डाणे उशिरा झाली आणि २० रद्द करण्यात आली. ४८ तासांनंतर विमानतळाचे कामकाज सामान्यपणे सुरू झाले.
उच्चस्तरीय चौकशी सुरू; परदेशी सायबर सहाय्याचा संशय
दरम्यान, देशातील विमान वाहतूक प्रणालीमध्ये झालेल्या अचानक आउटेज प्रकरणी केंद्र सरकारने उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. या तपासात बाह्य शक्तींचा किंवा सायबर हल्ल्यांचा सहभाग होता का, याचा शोध घेतला जात आहे. सायबर सुरक्षा तज्ञांचा अंदाज आहे की या हल्ल्यामागे परदेशी सरकार किंवा सायबर गटांचा हात असू शकतो. हॅकर्सनी नागरी जीपीएस सिग्नल्स कॉपी करून “सिग्नल ब्लास्ट” घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) गेल्या काही महिन्यांत जीपीएस छेडछाडीच्या तब्बल ४६५ हून अधिक घटना नोंदवल्या आहेत. यातील बहुतेक घटना जम्मू, अमृतसर आणि इतर सीमावर्ती भागात घडल्या आहेत.
स्वदेशी ‘नाव्हिक’ ठरू शकतो पर्याय
तज्ज्ञांच्या मते, इस्रोने विकसित केलेली स्वदेशी उपग्रह प्रणाली ‘नाव्हिक’ (NavIC) विमान वाहतूक सुरक्षेसाठी प्रभावी ठरू शकते. ही प्रणाली पूर्णपणे भारतीय नियंत्रणाखाली असल्याने बाह्य हस्तक्षेपाचा धोका कमी होईल. तज्ज्ञांचा विश्वास आहे की जर ‘नाव्हिक’ प्रणाली वापरात असती, तर दिल्ली विमानतळावरील आउटेजसारखी घटना टाळता आली असती.






