रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ईडीने (ED Action) अवैध उत्खनन प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे. तपास यंत्रणेने सोरेन यांना 14 ऑगस्ट रोजी चौकशीस हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. 1000 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा आरोप आहे. या प्रकरणात सोरेन यांचा निकटवर्तीय पंकज मिश्राला (Pankaj Mishra) ईडीने यापूर्वीच अटक केली आहे. तसेच याच प्रकरणात ईडीने यापूर्वी सोरेन यांची 18 नोव्हेंबर 2022 रोजी 10 तास चौकशीही केली होती. आता नव्याने बजावलेल्या समन्समुळे सोरेन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
ईडीने जुलै 2022 मध्ये सोरेन यांचे निकटचे सहकारी आणि बरहैत विधानसभा मतदारसंघातील त्यांचे आमदार प्रतिनिधी पंकज मिश्रा यांना अटक केली होती. या प्रकरणी त्यांच्या आणि इतर दोघांविरुद्ध फिर्यादी तक्रार (आरोपपत्राच्या समतुल्य) दाखल केली. सप्टेंबर 2022 मध्ये यंत्रणेने रांची येथील एका विशेष न्यायालयाला माहिती दिली की, त्यांनी झारखंडच्या साहिबगंज जिल्हा आणि आसपासच्या भागात 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या दगडांची बेकायदेशीर खाण शोधून काढली आहे. हे सर्व पंकज मिश्रा यांच्या नियंत्रणाखाली आहे.
47 ठिकाणी झाली होती छापेमारी
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, या मनी लॉड्रिग प्रकरणासंदर्भात 47 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. यात 5.34 कोटी रुपयांची रोकड, 13.32 कोटी रुपयांच्या बँक ठेवी. 30 कोटी रुपयांची बोट, पाच स्टोन क्रशर आणि दोन ट्रक जप्त करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर छाप्यात दोन एके-47 रायफलीही जप्त करण्यात आल्या होत्या, ज्यानंतर झारखंड पोलिसांनी त्यांच्याच असल्याचा दावा केला होता.