मोहाली-चंदीगड सीमेवर शेतकऱ्यांच आदोलन! ३३ शेतकरी संघटना सहभागी, चंदीगड पोलिसही अलर्ट मोडवर

मोहाली-चंदीगड सीमेवर शेतकऱ्यांचे तीन दिवसीय आंदोलन सुरू झाले आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या बॅनरखाली 28 नोव्हेंबरपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे.

    नवी दिल्ली : मोहाली-चंदीगड सीमेवर शेतकऱ्यांचे तीन दिवसीय आंदोलन सुरू झाले आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या बॅनरखाली 28 नोव्हेंबरपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. या आंदोलनात ३३ शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. भारतीय किसान युनियन लखोवालचे प्रेस सेक्रेटरी रणबीर सिंग म्हणाले की, राज्य आणि केंद्र सरकार दिलेली आश्वासने मोडत आहेत. बैठकांमध्ये मागण्या मान्य होऊनही आश्वासनांची पूर्तता होत नसल्याचं ते म्हणाले.

    आता विविध मागण्यांबाबत शेतकऱ्यांचा केंद्र सरकारविरोधातील आंदोलन पाहता चंदीगड-मोहाली सीमेजवळ सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थेबाबत पंजाबचे एसपी अमनदीप ब्रार यांनी सांगितले की, आंदोलनासाठी आलेले शेतकरी पुढील तीन दिवस येथे आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या आंदोलनादरम्यान सर्वसामान्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

    मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौसफाटा

    आणखी महिती देताना ते म्हणाले की,  शेतकऱ्यांच्या आंदोलना दरम्यान, पंजाब पोलिस सुरक्षा वर्तुळाच्या पहिल्या रांगेत तैनात केले जातील, त्यानंतर चंदीगड पोलिस कर्मचारी असतील. दुसऱ्या रांगेत रॅपिड अॅक्शन फोर्स आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत वज्र वाहन, जल तोफ आदी वाहनेही तैनात आहेत. केंद्रीय सुरक्षा दलाचे जवानही तिसऱ्या रांगेत तैनात करण्यात आले आहेत. 28 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेत पार पाडण्याचा पोलिसांचा प्रयत्न असेल.