दिल्ली निवडणुकीच्या मतमोजणीच्या दरम्यान राहुल गांधींविरुद्ध FIR, काय आहेत आरोप (फोटो सौजन्य-X)
FIR lodged against Rahul Gandhi Marathi : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. देशविरोधी विधाने केल्याच्या आरोपाखाली ओडिशाच्या झारसुगुडा जिल्ह्यात त्यांच्याविरुद्ध हा एफआयआर दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात शनिवारी (8 फेब्रुवार) एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. दरम्यान झारसुगुडा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्ष, भाजप युवा शाखा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि बजरंग दलाच्या सदस्यांकडून तक्रारी आल्याचे त्यांनी सांगितले. ५ फेब्रुवारी रोजी उत्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक हिमांशू लाल यांनी राहुल गांधींविरुद्ध दिलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम १५२ (भारताच्या सार्वभौमत्वाला, एकतेला आणि अखंडतेला धोका निर्माण करणारी कृत्ये), १९७ (१-डी) (भारताच्या एकतेला, सार्वभौमत्वाला, अखंडतेला किंवा सुरक्षिततेला धोका निर्माण करणारी खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती निर्माण करणे किंवा प्रकाशित करणे) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की राहुल गांधी जाणूनबुजून देशविरोधी विधाने करत आहेत ज्यामुळे प्रत्येक भारतीय व्यक्ती दुखावला जात आहे.
पोलिस महानिरीक्षकांनी ही तक्रार झारसुगुडाचे पोलिस अधीक्षक परमार स्मित पुरुषोत्तमदास यांच्याकडे चौकशी आणि आवश्यक कायदेशीर कारवाईसाठी पाठवली होती. पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार, राहुल गांधींविरुद्ध झारसुगुडा पोलिस ठाण्यात एफआयआर (प्रकरण क्रमांक ३१) नोंदवण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते श्रीकांत जेना म्हणाले, ‘राहुल गांधींवरील आरोपांचे स्वरूप मला माहित नाही, मला ते आधी पाहू द्या.’ काँग्रेस एक राजकीय पक्ष म्हणून भाजप आणि आरएसएसच्या विचारसरणीविरुद्ध लढत आहे. ही बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे.