माजी पंतप्रधान राजीव गांधींचा मारेकरी संथनचा मृत्यू, चेन्नईतील त्यांच्याच नावाच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास!

राजीव गांधींचा मारेकरी संथन हा अनेक दिवसापासून आजारी होता, चेन्नईच्या राजीव गांधी जनरल हॉस्पिटलमध्ये त्याने अखेरचा श्नास घेतला.

    देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi ) यांचा मारेकरी संथन याचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू (Rajiv Gandhi Killer Santhan Dies) झाला. अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावावर असलेल्या चेन्नईच्या सरकारी रुग्णालयात’च संथनचा मृत्यू झाला. तो ५५ वर्षाचा होता. संथनचं जानेवारीत यकृत निकामी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तो इतर काही आजारांनी त्रस्त होता.

    11 नोव्हेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधी हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 6 दोषींना सोडण्याचे आदेश दिले होते. आदेशानंतर दुसऱ्या दिवशी नलिनी, श्रीहरन, संथन, रॉबर्ट पायस, जयकुमार आणि रविचंद्रन यांची तब्बल ३२ वर्षांनंतर तुरुंगातून सुटका झाली होती. नलिनी आणि रविचंद्रन यांची सुटका करून त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती, परंतु उर्वरित चौघांना त्रिची मध्यवर्ती कारागृहात विशेष शिबिरात ठेवण्यात आलं होतं. कारण हे चौघेही श्रीलंकेचे नागरिक होते.

    त्यानंतर संथनने त्रिची तुरुंगातील विशेष शिबिरातील त्याच्या सेलमधून एक खुलं पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यानं आपल्याला सूर्यप्रकाशही दिसत नसल्याचं म्हटलं होतं. पत्राद्वारे त्यांनी जगभरातील तमिळांना आवाज उठवण्याचे आवाहन केलं होतं जेणेकरून ते त्यांच्या देशात परत जातील.