पाण्याची टंचाई
भारतातील पाणी संकट केवळ पाणी टंचाईपुरते मर्यादित नाही. आपण रोज पित असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या ग्लासपर्यंत हे संकट एखाद्या साथीच्या रोगाप्रमाणे पोहोचले आहे.आपल्या आरोग्यासाठी हा गंभीर मुद्दा झाला आहे.एकीकडे भूजलाची पातळी कमी होत आहे, तर दुसरीकडे औद्योगिक प्रदूषण वेगाने वाढत आहे.त्यामुळे जड धातू आणि कीटकनाशकांचे विषारी मिश्रण घरगुती पाणीपुरवठ्यात मोठ्या प्रमाणात प्रवेश करत आहे.माणसाच्या जगण्यासाठी अत्यावश्यक असलेला पाणी हा मुख्य स्रोतच आरोग्यासाठी धोकादायक ठरू लागला आहे. जाणून घेऊयात डॉ.अनिल कुमार, जलशास्त्रज्ञ, युरेका फोर्ब्स यांच्याकडून भूजल संकट आणि त्याद्वारे होणाऱ्या आरोग्याच्या समस्या.
जमिनीच्या खाली असलेल्या पाण्याच्या साठ्यावर आपण खूप अवलंबून असतो. ग्रामीण भागातील जवळजवळ ८५ टक्के पिण्याचे पाणी आणि शहरी भागातील ४५ टक्के पिण्याचे पाणी हे या भूजलातून मिळते. मात्र, हा महत्त्वाचा स्रोत आता कमी होऊ लागला आहे, अशुद्ध होऊ लागला आहे. वर्षानुवर्षे उपसा झाल्याने हे जमिनीखालचे जलसाठे मोठ्या प्रमाणात कमी झाले असून, आर्सेनिक आणि फ्लोराईड यांसारख्या विषारी पदार्थांचे त्यातील प्रमाणही वाढले आहे. शेतात वापरावयाची कीटकनाशके जमिनीत मुरून ती भूजलामध्ये मिसळली गेली आहेत.कारखान्यांमधून पाण्यात थेट सोडल्या जाणाऱ्या अनियंत्रित कचऱ्यामुळे क्रोमियम, शिसे, कॅडमियम आणि पारा यांसारख्या जड धातूंचे पाण्यातील प्रमाण वाढले आहे.
कीटकनाशकांचा वापर जास्त
कीटकनाशकांची समस्या-जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कीटकनाशकांचा वापर करणारा म्हणून आपला देश ओळखला जातो. कीटकनाशकांच्या या अतिवापरामुळे भूजल प्रदूषणाची समस्या उग्र होऊ लागली आहे.केंद्रीय भूजल मंडळाने काही विहिरींमधील पाण्याचे नमुने तपासले.त्यांतील २० टक्के नमुन्यांमध्ये सुरक्षा मानकांपेक्षा जास्त दूषित पदार्थ आढळले आहेत.या मंडळाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे,की भारतातील निम्म्याहून अधिक जिल्ह्यांमधील विहिरींचे पाणी नायट्रेट आणि फ्लोराईडमुळे दूषित झाले आहे.
‘भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्र’ भूजल व्यवस्थापनाच्या कामाला नवी ओळख, नवा आयाम देईल – अजित पवार
औद्योगिक विस्तार
औद्योगिक विस्तारामुळे हे संकट आणखी वाढले आहे. क्रोमियम, शिसे, कॅडमियम आणि पारा यांसारखे जड धातू उद्योगांमधून बाहेर सोडल्या जाणाऱ्या घाणीमुळे आणि पाझरामुळे भूजलात प्रवेश करतात. विशेषतःशहरी-औद्योगिक क्लस्टर्समध्ये आणि तीव्र खाणकाम असलेल्या प्रदेशांमध्ये हे प्रकार जास्त होतात.एकदा भूजलात मिसळल्यावर, ही रसायने वेगळी राहत नाहीत.
आयआयटी मद्रास या संस्थेने इंडक्टिव्हली कपल्ड प्लाझ्मा मास स्पेक्ट्रोमेट्री आणि अल्ट्रा हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी-हाय रिझोल्यूशन मास स्पेक्ट्रोमेट्री या प्रगत विश्लेषणांचा वापर करून, भूजलातील आर्सेनिक, क्रोमियम आणि कॅडमियमचे प्रमाण नोंदवले आहे.हे प्रमाण भारतीय मानक ब्युरोने निश्चित केलेल्या मापदंडाच्या(आयएस १६२४०)जवळपास येत असल्याचे दिसून आले.ब्रँडेड आणि जेनेरिक फिल्टरेशन सिस्टीम या दोन्हींमधून पाण्यामध्ये कीटकनाशक द्रव्ये मिसळली जात असल्याचे त्यातून सिद्ध झाले.
पाणी गाळण्यातील त्रुटीचा धोका
या समस्येचे गांभीर्य लक्षात घेता,पाणी गाळून घेणे हा वैयक्तिक आरोग्यसंरक्षणासाठी एक महत्त्वाचा उपाय असल्याचे समोर आले आहे.परंतु, पाणी गाळून घेण्याची प्रणाली सर्वत्र सारखी नाही. आयआयटी मद्रासच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की ब्रँडेड फिल्टरमध्ये १२,००० लिटरपर्यंत दुषित घटक काढून टाकण्याची कार्यक्षमता असते,तर सामान्य आणि ब्रँडेड नसलेले फिल्टर खूप लवकर खराब होतात, कधीकधी ते फक्त १० लिटरनंतर निरुपयोगी होतात.
हा निष्कर्ष कोणत्याही ब्रँडचे समर्थन करण्यासाठी वापरला जाणे अपेक्षित नाही. फिल्टरेशनच्या गुणवत्तेमुळे सुरक्षित आणि असुरक्षित पाणी पिणाऱ्या कुटुंबांमध्ये फरक कसा निर्माण होऊ शकतो याचा पुरावा म्हणून याकडे बघणे महत्त्वाचे आहे. ग्रामीण आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांमध्ये स्वस्त फिल्टर घेतले जातात, तिथे ब्रँडच्या नावाखाली सुरक्षिततेची खोटी भावना निर्माण होते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
आरोग्यावर वेगवेगळे परिणाम-दूषित भूजलाच्या दीर्घकालीन वापरामुळे आरोग्यावर होणारे परिणाम संपूर्ण भारतात दिसून येत आहेत.पश्चिम बंगाल आणि बिहारमधील उच्च आर्सेनिक पट्ट्यांमध्ये ‘ब्लॅकफूट रोग’ दिसून येतो, तर राजस्थान आणि आंध्र प्रदेश मधील लोक फ्लोरोसिसशी झुंजत आहेत. पंजाबमध्ये कीटकनाशकांमुळे दूषित झालेल्या पाण्याने कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचे दीर्घकाळापासून दिसून येत आहे.
Water News: तापमान वाढीमुळे भूजल पातळीत घट; तलाव,विहिरींची पाणीपातळी खालावली
काय आहे संशोधन
अलीकडच्या एका संशोधनानुसार,६.६ कोटींहून अधिक भारतीयांना हाडे किंवा दातांशी निगडित फ्लोरोसिसचा त्रास होत आहे. नायट्रेटशी संबंधित ‘ब्लू बेबी सिंड्रोम’चे प्रमाणही वाढत आहे. मुले विशेषतः असुरक्षित आहेत, कारण त्यांचे शरीर विषारी पदार्थ अधिक सहजपणे शोषून घेते, तथापि, त्यांची पचनशक्ती तितकी सक्षम नसते. गर्भवती महिलांना जास्त धोका असतो, कारण त्यांच्या शरीरात गेलेले अनेक दूषित घटक नाळेतून गर्भापर्यंत पोहोचू शकतात आणि त्याच्या विकासावर परिणाम करू शकतात.
शाश्वत उपायांची आवश्यकता
भारतातील या गंभीर भूजल संकटाला तोंड देण्यासाठी घरगुती पद्धतीने पाणी गाळून घेण्यापलीकडे पद्धतशीर सुधारणा आवश्यक आहेत. पाण्याच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्याची यंत्रणा मजबूत करणे, कठोर औद्योगिक विसर्जन नियम लागू करणे आणि कीटकनाशकांचा वापर कमी करणाऱ्या शाश्वत शेतीच्या पद्धतींना प्रोत्साहन देणे हे राष्ट्रीय पातळीवर होणे अत्यावश्यक आहे.
केंद्रीय भूजल मंडळाने जलद नियामक सुधारणा करण्याची शिफारस केली आहे तसेच निकृष्ट दर्जाच्या शुद्धिकरण यंत्रांना बाजूला ठेवण्यासाठी विकेंद्रित पाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि प्रमाणित गाळण प्रणालींचे मानकीकरण करण्याचे आवाहन केले आहे.जागतिक आरोग्य संघटननेसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनीदेखील भारतातील भूजल प्रदूषण एक मोठा सार्वजनिक आरोग्य धोका असल्याचे नमूद केले आहे.
भूजलसाठे होत आहे दुर्मिळ
जसे भूजलसाठे दुर्मिळ आणि प्रदूषित होत चालले आहेत, तसे या संकटामुळे सार्वजनिक आरोग्य आणि राष्ट्रीय विकासाच्या संधींवर अपरिवर्तनीय आणि भीषण परिणाम होऊ नयेत यासाठी ठोस आणि आक्रमक पावले उचलणे अत्यावश्यक झाले आहे. आयआयटी मद्रासच्या संशोधनातून भारतातील दूषित जलव्यवस्थेचे गंभीर वास्तव समोर येते. पाण्याच्या शुद्धीकरण प्रणालींची गुणवत्ता हा अक्षरशः जीवन-मरणाचा प्रश्न ठरू शकतो. कोणत्याही समस्येवर तंत्रज्ञान हे एकमेव उत्तर असू शकत नाही, हा संदेश यातून मिळतो.
यातून तातडीने,बहुस्तरीय कृतीची आवश्यकता दिसून येते.यामध्ये भूजलाचे पुढील रासायनिक संकटापासून संरक्षण करणे, जलसाठे पुनर्संचयित करणे आणि एकमेव शाश्वत मार्ग म्हणून मजबूत जल प्रशासन लागू करणे यांचा समावेश होतो.हे संकट केवळ पाण्यापुरते नाही,तर ते आपल्या अस्तित्वावरही आघात करणारे आहे. भूजल पुनर्भरणीसाठी अनेक वर्षे लागू शकतात,तोपर्यंत सध्याच्या प्रदुषणाच्या संकटापासून आपल्याला स्वतःचे रक्षण स्वतःच करावे लागणार आहे.त्यासाठी इतर गोष्टींची आपण वाट पाहू शकत नाही.






