ऑपरेशन सिंदूरच्या यशामागे ‘हळदी घाटी’चा हात, काय होती सैन्याची जबरदस्त योजना
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशामागे ‘हळदी घाटी’ आणि ‘ट्रॉपेक्स’ यासारख्या सैन्य सरावांचा मोठा वाटा आहे. भारताने दहशतवाद्यांच्या कारवाया संपवण्यासाठी इतक्या कमी वेळात एवढी जबरदस्त योजना कशी बनवली आणि कशाप्रकारे पाकिस्तानला फक्त चार दिवसांत गुडघे टेकायला लावले?, याची संपूर्ण माहिती आता, 10 दिवसांनंतर समोर आली आहे.
प्रत्यक्षात, 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी ‘ऑपरेशन सिंदूर’ची रूपरेषा तयार झाली होती. सुरुवातीला हे 12 मे 2025, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी राबवण्याची योजना होती, पण जोरदार तयारीमुळे हे 6-7 मेच्या रात्री सुमारे दीड वाजताच सुरू करण्यात आले.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पहिल्यांदाच थल, जल आणि वायू – तिन्ही सैन्यदलांचा एकत्रित वापर करत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. आणि फक्त चार दिवसांत पाकिस्तानला युद्धबंदीची घोषणा करावी लागली.
न्यूज एजन्सी ANI च्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने एक वेगवान आणि समन्वय साधलेली सैन्य कारवाई केली, ज्यामध्ये ‘हळदी घाटी’ आणि ‘ट्रॉपेक्स’सारख्या सरावांचा महत्त्वाचा वाटा होता. 18 ते 21 एप्रिल 2025 दरम्यान ‘हळदी घाटी’ नावाचा युद्धसराव झाला होता, ज्याचा उद्देश तिन्ही सैन्यदलांमधील सततचा संप्रेषण सुनिश्चित करणे होता. याच दरम्यान अरब सागरात नौदलाचा प्रमुख थिएटर स्तराचा युद्धसराव ‘ट्रॉपेक्स’ देखील सुरू होता, ज्यामध्ये जवळपास सर्व प्रमुख युद्धनौका सहभागी होत्या.
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर लगेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्या नेतृत्वाखाली डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेयर्स ने ‘हळदी घाटी’ आणि ‘ट्रॉपेक्स’ मधून मिळालेल्या अनुभवांची अंमलबजावणी सुरू केली. तिन्ही सैन्यदलांमध्ये एकात्मिक संप्रेषण प्रणालीचे यशस्वी परीक्षण करण्यात आले, ज्यामुळे ऑपरेशनच्या तयारीला वेग आला.
7 मे 2025 च्या रात्री दीड वाजता जेव्हा ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत 9 दहशतवादी तळांवर हल्ले करण्यात आले, त्याआधीचा पूर्ण वेळ तिन्ही सैन्यदलांच्या नेटवर्कला एकत्र आणण्यासाठी आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी वापरला गेला. यासोबतच भारत-पाकिस्तान सीमेवरील अग्रभागी क्षेत्रांमध्ये संयुक्त एअर डिफेन्स सेंटर देखील स्थापण्यात आले, जिथे तिन्ही सैन्यदलांची एअर डिफेन्स आणि कमांड-एंड-कंट्रोल प्रणाली एकत्रित करण्यात आली.
या तयारीमुळे पाकिस्तानने 7, 8 आणि 9 मे रोजी केलेल्या ड्रोन हल्ल्यांना प्रभावीपणे परतवले गेले. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताच्या एअर स्ट्राइक मुळे बावचळलेल्या पाकिस्तानने सैन्य ठिकाणांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले, जे भारताच्या S-400 एअर डिफेन्स प्रणालीने हवेतच निष्क्रिय केले. एकात्मिक संप्रेषण यंत्रणेच्या जोरावर दिल्ली मुख्यालयात बसलेल्या कमांडरना मैदानातील परिस्थितीची रिअल-टाइम माहिती मिळत राहिली, ज्यामुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया जलद आणि अचूक राहिली.






