मान्सून पर्वतांपासून मैदानी प्रदेशांपर्यंत हाहाकार माजवतो (संग्रहित फोटो)
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यात पश्चिम हिमालयीन प्रदेशात, विशेषतः हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. शुक्रवारी, हिमाचल प्रदेशात पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये एकाचा मृत्यू झाला आणि दोघे जखमी झाले. दोन्ही राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नद्या आणि डोंगरावरील ओढे दुथडी भरून वाहत असून, पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.
उत्तराखंडच्या यमुनोत्री महामार्गासह दोन्ही राज्यांमधील शेकडो रस्ते बंद असून मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी झालेला मुसळधार पाऊस इतका तीव्र होता की, अनेक भागांतील शाळा बंद ठेवाव्या लागल्या. हवामान विभागाने या दोन राज्यांसाठी, तसेच वायव्य भारत आणि देशाच्या इतर अनेक भागांसाठी तीन ते चार दिवसांचा पावसाचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशात, सिरमौर आणि सोलन जिल्ह्यांना या भीषण हवामानाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कुल्लू जिल्ह्यात दगड कोसळून एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.
कालका-शिमला राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी झालेल्या भूस्खलनात लोक जखमी झाल्याचेही वृत्त आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे त्रिपुरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. उनकोटी, खोवाई आणि धलाई जिल्ह्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. पूर आणि पावसामुळे सुमारे ११००० लोक बेघर झाले आहेत, तर ४०२७ घरांचे नुकसान झाले आहे.
यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गासह ११८ रस्ते बंद
मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यामुळे आणि भूस्खलनामुळे उत्तराखंडमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गासह ११८ रस्ते बंद आहेत. पाऊस आणि वारंवार होणाऱ्या भूस्खलनामुळे गंगोत्री राष्ट्रीय महामार्ग अद्याप पुन्हा सुरू झालेला नाही. मुसळधार पावसामुळे देहरादूनसह सात जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी अनेक शाळा बंद राहिल्या. हरिद्वार जिल्ह्यातील भगवानपूर येथे नदीला आलेल्या पुरात बुडून एका १८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. हरियाणा, पंजाब, चंदीगड, दिल्ली, पश्चिम आणि पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, बिहार आणि जवळपास सर्व ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची (७-२० सें.मी.) नोंद झाली.






