अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर उद्घाटन सोहळा (Ram Mandir Inauguration) अवघ्या काही क्षणांवर येऊन ठेपला आहे. राम मंदिर उद्घाटनाबाबत देशातील सर्वच भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अयोध्येतील राम मंदिराचे व प्रभू श्री रामांच्या मूर्तीचे (Prabhu Ram First Look) अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. यानंतर आता इस्त्रोने भव्य राम मंदिराचे सॅटेलाइट फोटो (Ram Mandir Satellite photos) प्रसिद्ध केले आहेत. हैदराबाद येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्राने अयोध्येतील भव्य श्री राम मंदिराचे छायाचित्र काढले आहेत.
इस्त्रोकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अयोध्येतील राम मंदिर फोटोमध्ये शरयू नदी व दशरथ महाल स्पष्टपणे दिसत आहे. त्याचबरोबर नूतनीकरण केलेले अयोध्या रेल्वे स्थानकही दिसून येत आहे. तसेच 2.7 एकरामध्ये जमिनीवर बांधण्यात आलेले भव्य राम मंदिर देखील पूर्णपणे दिसत आहे. इस्त्रोने स्वदेशी उपक्रमाच्या माध्यमातून या भव्य मंदिराचे फोटो उद्घाटनापूर्वी समोर आणले आहेत.
राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. देशभरामध्ये या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असून ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर अन्नदान, भजन असे उपक्रम देखील घेण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दुपारी 12 नंतर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.