अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा (फोटो- ani)
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. राजधानी नवी दिल्लीत देखील पावसाची एंट्री झाली आहे. राजधानी दिल्लीसह आणि उत्तर भारतातील अनेक राज्यात पाऊस सुरु आहे. १४ जुलै रोजी नोएडा-एनसीआरमध्ये पाऊस झाला आहे. येत्या काळात दिल्लीसह अनेक राज्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान हवामान विभागाने अनेक राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे. त्याबाबत जाणून घेऊयात.
सध्या देशभरात मान्सून सक्रिय झाला आहे. यामुळे अनेक राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस होत आहे. दरम्यान हवामान विभागाने आता नवीन अलर्ट जारी केला आहे. कोणत्या राज्यांना हवामान विभागाने कोणता अलर्ट दिला आहे, हे जाणून घेऊयात.
हवामान विभागाच्या अलर्टनुसार, आज दिल्लीत आणि राजस्थानमध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. १५ ते १८ जुलैपर्यंत दिल्ली आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. २० जुलैपर्यंत उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात तर पावसाने कहर केला आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
मध्य भारतात देखील पावसाचा ईशारा हवामान विभागाने दिला आहे. आयएमडीच्या अलर्टनुसार छत्तीसगड, ओडिशा, बिहार, अंदमान-निकोबार द्वीप येथे मुसळधार पाऊस होणार आहे. १९ ते २० जुलै दरम्यानपश्चिम बंगाल, सिक्कीम राज्यात जोरदार पाऊस होणार आहे. पुढील ७ दिवस देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
पुणे, रत्नागिरी, मुंबईसह सांगलीला पावसानं झोडपलं
गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याचे पाहिला मिळत होते. असे असताना आता राज्यातील विविध भागांना मुसळधार पावसाने झोडपलं आहे. पुणे, रत्नागिरी, मुंबईसह सांगलीमध्ये जोरदार पाऊस होत आहे. रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे बहुतांश शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच, मुंबईतील कांदिवली, बोरीवली, गोरेगाव, जोगेश्वरी, वांद्रे परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली.
राज्यातील विविध भागांत धुवाधार पाऊस; पुणे, रत्नागिरी, मुंबईसह सांगलीला पावसानं झोडपलं
रत्नागिरीत सकाळपासून मुसळधार पाऊस होत आहे. सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. याशिवाय, ढालघर फाट्याजवळ मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी दिसून आले. या मुसळधार पावसामुळे म्हसळामधील डोरजे पूल पाण्याखाली गेला आहे. हवामान विभागाने पावसाबाबत इशाराही दिला होता. जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, सातारा, आणि कोल्हापूरच्या घाट भागात पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस पडेल. काही भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.