उत्तर भारताला मुसळधार पावसाचा इशारा (फोटो- ani)
नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाने आज देशातील अनेक राज्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. राजधानी दिल्ली, मध्य भारत, उत्तर भारत आणि अन्य राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. दिल्ली शहरात काल रात्री जोरदार पाऊस झाला. दिल्लीसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन ते चार दिवस दिल्लीसह अन्य राज्यात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये गेले काही दिवस अत्यंत मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सिरमौर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशमधील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने आणि सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. तसेच नागरिकांना सतर्क राहण्यासाठी आवाहन केले आहे. २० जूनपासून आतापर्यंत तब्बल १,२२० कोटींचे नुकसान झाले आहे.
हिमाचलप्रदेशमध्ये १७० मार्ग बंद
मुसळधार पावसाने हिमाचल प्रदेशमधील १७० रस्ते बंद झाले आहेत. काही मार्ग ३० मिनिटांपेक्षा अधिक काळ बंद आहेत. रस्त्यांवरील चिखल साफ करण्याचे काम सुरु आहे. हिमाचल प्रदेशमध्ये आज हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. मंडी जिल्ह्यात १२१ रस्ते बंद झाले आहेत. राज्यात पावसामुळे आतापर्यंत ११२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस होणार
उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आणि दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, तसेच नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस होणार
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याचे पाहिला मिळत आहे. असे असताना राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर या ठिकाणी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 24 ते 31 जुलै दरम्यान महाराष्ट्रासह मध्य भारतात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती या भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.