भारतात यावर्षी कसा असणार मान्सून ? (फोटो- istockphoto)
पुणे: सध्या राज्यावर अवकाळी पावसाचे संकट घोंघावत आहे. काही ठिकाणी कडक उन्हाळा जाणवत आहे. तापमान 40 अंशाच्या पुढे देखील गेल्याचे काही ठिकाणी पाहायला मिळाले. दरम्यान देशात यंदा किती पाऊस पडणार याबाबत आयएमडीने एक अंदाज वर्तवला आहे. यंदा देशभरात किती पाऊस होणार याचा आयएमडीने दिलेला अंदाज जाणून घेऊयात.
आयएमडीकडून म्हणजेच भारतीय हवामान विभागाने एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये यंदा किती पाऊस होणार याबाबत माहिती देण्यात आली. दरम्यान या वर्षी मान्सूनवर पडणाऱ्या एल निनोच्या प्रभावाची शक्यता नाकारण्यात आली आहे. एल निनोमुळे पावसावर मोठा परिणाम होत असतो.
प्रशांत महासागराचे तापमान वाढले की एल निनोची निर्मिती होत असते असे म्हटले जाते. एल निनोमुळे पर्जन्यमानामध्ये घट होत असते. मात्र यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव पडणार नाही असे भारतीय हवामान विभागाने सांगितले. त्यामुळे देशभरात यावर्षी सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यावर्षी मान्सून सामान्य होण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जून महिन्यात देशभरात उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवू शकतो. यंदा तापमान सरासरीपेक्षा जास्त असू शकते. उत्तर भारताच्या पूर्व भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज आहे. तापमान 45 अंशापेक्षा पुढे जाण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास अत्यंत महत्वाचे
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणात अनेक बदल पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी कडक उन्हाळा, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासाह पाऊस, गारपीट होत आहे. कडक उन्हाच्या झळा बसत असतानाच राज्यावर अवकळी पावसाचे संकट उभे राहिले आहे. सध्या पुणे जिल्ह्यासह अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढत आहे. राज्यभरात उन्हाचा कडाका वाढला आहे. अनेक ठिकाणी 35 अंशाच्या वरपर्यंत तापमान पोहोचले आहे. मात्र हवमान विभागाने राज्याला अवकळी पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभगाने राज्याला पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात वादळी वाऱ्यासाह पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे. हवामान विभगाने राज्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. उर्वरित ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पाच दिवस राहणार पाऊस
ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या काळात राज्यात कमाल तापमान ३५ ते ४२ अंश सेल्सिअस दरम्यान राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. बाष्पयुक्त वातावरण आणि तापमानवाढीमुळे जास्त उंचीचे ढग निर्माण होत आहेत, त्यामुळे पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण राहील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.