जम्मू-कश्मीरबाबत आफगाणिस्तान मंत्र्यांचे मोठं विधान; पाकिस्तानचा जळफळाट
India-Afganistan News: अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी आमिर खान मुत्ताकी भारत दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान, आमिर मुत्ताकी यांच्या एका विधानाने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. आमिर खान मुत्ताकी यांनी, ‘जम्मू-कश्मीर हा भारताचे अविभाज्य राज्य’ असल्याचे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाने पाकिस्तानला चांगलाच झटका बसला आहे
भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनामुळे दोन्ही देशांमधील संबंधांना नवे परिमाण लाभले असून द्विपक्षीय सहकार्याचा एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. मात्र, या निवेदनावर पाकिस्तानने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या निवेदनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान काहीसा एकटा पडला आहे. पाकिस्तानने या विधानाला आपल्या सार्वभौमत्वावर हल्ला ठरवत तीव्र आक्षेप नोंदवला आहे. दोन्ही देशांदरम्यान वाढणाऱ्या रणनीतिक आणि आर्थिक सहकार्यामुळे या भागातील राजनैतिक समीकरणांमध्येही बदल घडू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.
२०२१ मध्ये सत्तेत आल्यानंतर उच्चस्तरीय अफगाणिस्तानच्या नेत्याचा हा पहिलाच भारत दौरा आहे. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी ९ ते १६ ऑक्टोबर दरम्यान भारत दौऱ्यावर आले आहेत. आमिर मुत्ताकी आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यातील चर्चेनंतर, १० ऑक्टोबर रोजी एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. या निवेदनात प्रादेशिक शांतता, दहशतवादाविरुद्ध सहकार्य आणि परस्पर विश्वास यावर भर देण्यात आला. त्याचवेळी निवेदनात जम्मू आणि काश्मीरला भारताचा भाग म्हणून संबोधण्यात आले, ज्यामुळे पाकिस्तान संतप्त झाला.
भारत-अफगाणिस्तान संयुक्त निवेदनामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने इस्लामाबादमधील अफगाण राजदूताला बोलावून नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की जम्मू आणि काश्मीरला भारताचा भाग म्हणून वर्णन करणे हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांचे उघड उल्लंघन आहे. दहशतवाद हा पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न असल्याचे अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या विधानावरही पाकिस्तानने आक्षेप घेतला. पाकिस्तानने दावा केला की ते अफगाणिस्तान सरकारला अफगाणिस्तानच्या भूमीवरून कट रचणाऱ्या दहशतवादी गटांबद्दल सतत माहिती देत आहे.
भारत आणि अफगाणिस्तानने जारी केलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी दहशतवादाविरुद्ध ठाम भूमिका घेतली आहे. अफगाणिस्तानने भारताला आश्वासन दिले आहे की, भारताविरुद्ध कोणत्याही दहशतवादी कारवायांसाठी त्याचा भूभाग वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. दोन्ही देशांनी सर्व प्रकारच्या दहशतवादी कृतींचा तीव्र निषेध नोंदवला आहे.
भारताने अफगाणिस्तानातील आरोग्य क्षेत्राच्या विकासासाठी अनेक प्रकल्पांची घोषणा केली आहे. यामध्ये काबूलमधील इंदिरा गांधी बाल आरोग्य संस्थेत थॅलेसेमिया केंद्र उभारणे, विविध प्रांतांमध्ये निदान प्रयोगशाळा, रुग्णालये आणि प्रसूती आरोग्य क्लिनिक उभारणीचा समावेश आहे. या भेटीनंतर अफगाण परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी भारत-अफगाणिस्तान संबंधांचे भविष्य “उज्ज्वल आणि परस्पर हितकारक” असल्याचे सांगितले.