जम्मू काश्मीरमध्ये 2 दहशतवादी ठार (फोटो- ani)
जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये गोळीबार
2 दहशतवाद्यांना कंठस्नान
भारतीय लष्कराचे 2 जवान जखमी
Indian Army Killed 2 Terrorists: जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये भारतीय लष्कर व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली आहे. दोन्ही बाजूने गोळीबार सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलाने 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. तर या चकमकीत 3 जवान जखमी झाले आहेत.
भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन गुड्डर सुरू केले आहे. दरम्यान या चकमकीत भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाल्याचे देखील समजते आहे. तसेच 3 जवान जखमी झाल्याचे समोर येत आहे. कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
भारतीय लष्कराने गुड्डर जंगलात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. संपूर्ण जंगलाला सुरक्षा दलांनी वेढा घातला आहे. मोठ्या प्रमाणात सैनिक या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवत आहेत. दरम्यान कंठस्नान घातलेला एक दहशतवादी सुरक्षा दलांच्या हीटलिस्टमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलाने जम्मू काश्मीरमध्ये मोठे ऑपरेशन हाती घेतले आहे. दहशतवाद्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे.
कंठस्नान घातलेले दहशतवादी लष्कर ए तोयबाचे असल्याची शंका उपस्थित होत आहे. त्या दृष्टीने तपास केला जात आहे. या कारवाईत भारतीय लष्कर, पोलिस दल, सीआरपीएफची तुकडी सामील झाले आहेत. या जंगलात अजून काही दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूने तूफान गोळीबार सुरू आहे. सुरक्षा दलांचे अतिरिक्त जवान या कारवाईसाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे या कारवाईला आता वेग आला आहे. संपूर्ण जंगलाला वेढा घालण्यात आला आहे.
दहशतवादी कट रचल्याप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई
हशतवादाशी संबंधित एका प्रकरणात एनआयए (National Investigation Agency) देशातील पाच राज्ये आणि जम्मू-काश्मीरमध्ये एकूण २२ ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादाशी संबंधित एका गंभीर प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून हा छापा टाकण्यात येत आहे. छाप्यात स्थानिक पोलीस आणि निमलष्करी दलांची मदत घेतली जात आहे. सध्या ज्या राज्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे त्यात जम्मू-काश्मीर व्यतिरिक्त इतर राज्यांचा समावेश आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दहशतवादी कटाशी संबंधित एका प्रकरणाच्या तपासाच्या संदर्भात ही कारवाई करण्यात येत आहे. त्यांनी सांगितले की जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला, कुलगाम, अनंतनाग आणि पुलवामा जिल्ह्यांमध्ये शोधमोहीम सुरू आहे दहशतवादाशी संबंधित मोठ्या कट रचल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या छाप्यात अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.