मणिपूर : गेल्या काही दिवसांपासून मणिपूरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार (Manipur News) होताना दिसत आहे. त्यात दोन आदिवासी महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली. या घटनेमुळे देशभरात (Manipur Violence) संतापाची लाट उसळली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यावर जनमानसात प्रचंड संपात व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेवरून पीडित महिलेच्या पतीने तीव्र भावना व्यक्त केली. ‘कारगिल युद्धात सहभागी होऊन देश वाचवला पण पत्नीची अब्रू वाचवू शकलो नाही’, असे त्याने म्हटले आहे.
मणिपूरमध्ये दोन आदिवासी महिलांची नग्न परेड करण्यात आल्याच्या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीसह अन्य तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. या घटनेवर पीडितेचा पती असलेल्या एका माजी सैनिकाने म्हटलं की, ‘या घटनेने मला अत्यंत दु:ख झाले. मी त्याचे वर्णनही करू शकत नाही. मी श्रीलंकेत, कारगीरमध्येही देशाचे रक्षण केले पण आता निवृत्तीनंतर मी माझ्या पत्नीचे रक्षण करू शकलो नाही. जमावाने एका महिलेला विवस्त्र करून ज्याप्रकारे मारहाण केली, त्याची मी स्वप्नातही कल्पना करू शकत नाही. कोणत्याही वन्य प्राण्याच्या हल्ल्यापेक्षा ही घटना अधिक घृणास्पद होती’.
तीन महिलांना विवस्त्र होण्यास सांगितलं
मणिपूरच्या घटनेत तीनपैकी दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली. तिसऱ्या महिलेला जबरदस्तीने कपडे काढण्यास सांगण्यात आले. मात्र, ती व्हिडिओमध्ये दिसत नाही, असेही तक्रारीत सांगण्यात आले आहे.
जबरदस्तीने विवस्त्र होण्यास पाडले भाग
निवृत्त जवानाने सांगितले की, या तिन्ही महिलांना जबरदस्तीने कपडे उतरवण्यास सांगण्यात आले. मुलाला घेऊन जाणाऱ्या महिलेला नंतर तिच्या ओळखीच्या काही लोकांनी सोडवले. जमावाकडून लहान मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला गेला. पण जेव्हा तिचे वडील आणि भावाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मारण्यात आले.
युद्धापेक्षा ही जागा धोकादायक वाटतीये
‘मी कारगिल युद्ध पाहिले. त्यामध्ये आघाडीने सहभाग घेतला. पण आता मला आपलंच ठिकाण युद्धापेक्षाही जास्त धोकादायक वाटत आहे. यातील जमाव एका मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा तिचे वडील आणि भावाने महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मारण्यात आले.