कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार कोथुर मंजुनाथ यांनी ऑपरेशन सिंदूरवर शंका व्यक्त केली आहे (फोटो - सोशल मीडिया)
कर्नाटक : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने देखील सडेतोड उत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करुन 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आहेत. तिन्ही संरक्षण दलाच्या प्रमुखांनी यानंतर पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर अशी माहिती आहे. मात्र कॉंग्रेस आमदारांनी ऑपरेशन सिंदूरवर संशय घेतला आहे. कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार कोथुर मंजुनाथ यांनी याबाबत पुरावे सादर करण्याची मागणी केली आहे.
पहलगाममध्ये भारतातील 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर करुन 100 हून अधिक दहशतवादी मारले असून दहशतवादी तळ उद्धवस्त केले आहेत. कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार कोथुर मंजुनाथ यांनी या कारवाईवरच शंका व्यक्त केली आहे. “हा फक्त कारवाईचा ढोंग होता. त्यामुळे पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळाला नाही. त्यांना जो दिलासा मिळायला हवा होता, तो मिळाला नाही”, अशी टीका त्यांनी केली आहे. कोथुर मंजुनाथ म्हणाले की, “काहीही झालं नाही. फक्त दिखाव्यासाठी वरून तीन-चार विमानं पाठवून परत बोलावण्यात आली. याने पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या 26-28 लोकांना न्याय मिळेल का? अशा प्रकारे त्या महिलांचं दु:ख कमी होईल का? त्यांचा आदर करण्याचा हाच मार्ग आहे का? असे सवाल आमदार कोथुर मंजुनाथ यांनी उपस्थित केले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भारत सरकारने पाकिस्तानमध्ये नऊ मोठे दहशतवादी लाँचपॅड नष्ट करण्यात आले आणि त्यात सुमारे 100 दहशतवादी मारले गेले असल्याचे सांगितले. याबाबत पाकिस्तानमधील नुकसानीचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. याबाबत “100 दहशतवादी मारले गेले हे निश्चितपणे माहीत आहे का? त्यांची ओळख पटली का? 22 एप्रिल रोजी बैसरन खोऱ्यात हल्ला करणारे तेच दहशतवादी होते का”, असे प्रश्न कॉंग्रेस आमदार कोथुर मंजुनाथ यांनी विचारले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ऑपरेशन सिंदूरवर संशय व्यक्त करताना आमदार कोथुर मंजुनाथ म्हणाले की, “100 दहशतवादी मारले गेले हे निश्चित आहे का? आपल्या सीमेत घुसलेले हे दहशतवादी कोण होते? त्यांची ओळख काय आहे? सीमेवर सुरक्षा का नव्हती? ते कसे पळू गेले? आपण दहशतवादाची पाळंमुळे शोधून त्यांचा नायनाट केला पाहिजे. हे संपूर्णपणे गुप्तचर यंत्रणेचं अपयश आहे”, अशीही टीका मंजुनाथ यांनी केली. यावेळी त्यांनी माध्यमांवरही प्रश्न उपस्थित केले. “सर्व न्यूज टीव्ही चॅनेल वेगवेगळ्या कथा सांगत आहे. एक म्हणतंय इथे मारलं, एक म्हणतंय तिथे मारलं. प्रत्यक्षात कोण मारले गेले, कुठे मारले गेले आणि किती मारले गेले हे कोणीही सांगत नाही. सरकारकडून कोणतंही स्पष्ट विधान समोर आलं नाही”, अशा शब्दांत कर्नाटकमधील कॉंग्रेस आमदार कोथुर मंजुनाथ यांनी ऑपरेशन सिंदूरवर संशय घेतला आहे. युद्धाची परिस्थिती असताना विरोधकांनी मोदी सरकारला पाठिंबा दिला होता. आता मात्र कॉंग्रेसच्या आमदारांनी ऑपरेशन सिंदूरवर संशय घेतला आहे.