भिलवाडा : राजस्थानमधील भिलवाडा शहरात गुरुवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीमुळे भाजी मंडई बंद राहिल्याने शेतकरी संतप्त (Farmers Aggressive) झाले आणि त्यांनी भाजीपाला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि मार्केट बंद करण्याबाबत प्रशासनाला प्रश्न विचारण्यात आले.
काही वेळातच शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला हिंसक वळण लागले. शेतकऱ्यांनी गाड्यांमधून भाजीपाला काढून जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यास सुरुवात केली. हे दृश्य पाहून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला आणि शेतकऱ्यांना तेथून पळवून लावले.
भीलवाडा शहरातील अजमेर तिराह येथे उभारण्यात आलेली तात्पुरती भाजीमंडई हटविण्यासाठी एसडीएम आहवाद निवर्ती सोमनाथ (आयएएस) यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पोहोचले होते. तेथे जमलेल्या लोकांना हटवण्याचे समजावून सांगितले जात होते, त्याच दरम्यान काही शेतकरी आपली वाहने घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. प्रशासनाने कोणतीही माहिती न देता अचानक मंडईचे काम बंद केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
बाजार प्रशासनाशी चर्चा
बाजारात दररोज जाम असतो. ही बाब लक्षात घेऊन कोणतीही मोठी घटना घडू नये म्हणून या भाजी विक्रेत्यांना कृषी मार्केटमध्ये स्थलांतरित करण्याची योजना राबविण्यात येत आहे. एक- दोन दिवसांत सर्व काही सामान्य होईल. शेतकरी त्यांच्या काही कर समस्यांचा उल्लेख करत आहेत. बाजार प्रशासनाशी बोलून यावरही तोडगा काढण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.






