चिराग पासवान यांच्या रणनितीने JDU च्या गोटात अस्वस्थता; बिहार निवडणुकीआधी नितीश कुमारांचं टेन्शन वाढलं
आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी मोठी घोषणा केली आहे. बिहारच्या सर्व 243 विधानसभा जागांवर उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मी विधानसभा निवडणूक लढवणार आहे आणि बिहारच्या प्रत्येक मतदारसंघात आमचा उमेदवार असेल,” असा निर्धार आरा येथे आयोजित सभेत त्यांनी केला. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत रंगत येणार आहे.
चिराग पासवान म्हणाले, “लोक वारंवार विचारतात की मी विधानसभा निवडणूक लढवणार का, तर माझं उत्तर आहे असं होय. मी बिहारसाठी लढणार आहे, बिहारमधून नव्हे. मुख्यमंत्रीपदाची कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही. लोकशाहीत लोकांचेच अंतिम मत महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी कुठून निवडणूक लढवावी हे तुम्हीच ठरवा, मी तुमच्या निर्णयाचा आदर करेन, असंही त्यांनी म्हटलं आहे.
चिराग पासवान यांनी राजद (RJD) आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, “बिहारमध्ये ज्याला आपण ‘जंगलराज’ म्हणतो, त्यासाठी केवळ आरजेडी नव्हे, तर काँग्रेसही तितकीच जबाबदार आहे.” चिराग यांनी एनडीए सरकारने माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याच्या निर्णयाची आठवण करून दिली आणि हा निर्णय जनतेच्या भावनांचा सन्मान असल्याचंही ते म्हणाले.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना चिराग म्हणाले, “काँग्रेसची खरी अडचण ही आहे की पराभव स्वीकारण्याऐवजी ते आरोप करण्यात व्यस्त असतात. ईव्हीएमवर दोष, निवडणूक आयोगावर टीका, हे सगळं दाखवून राहुल गांधी यांनी आधीच पराभव स्वीकारला आहे.
विधानसभा निवडणूक लढवली, तरी ती काही असामान्य गोष्ट नसेल. माझ्या लढण्यामुळे एनडीएचा स्ट्राइक रेट सुधारेल. मात्र मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, लोकांमध्ये गैरसमज पसरवला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
चिराग पासवान यांनी केलेले हे वक्तव्य आगामी बिहार निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यांच्या भूमिकेमुळे एनडीएत नवचैतन्य येऊ शकतं. मात्र राज्यात लढत अटीतटीची बनण्याची शक्यता आहे.