भोपाळ : पोलीस गृहनिर्माण विभागात कार्यरत असलेल्या एका महिला इंजिनिअरच्या (Crorepati Engineer) घरी टाकलेल्या छाप्यानंतर संपत्ती पाहून पोलीसही चक्रावून गेलेत. प्रभारी सहाय्यक इंजिनिअर असलेल्या हेमा मीणा (Hema Meena) यांच्या घरात प्रचंड संपत्ती पोलिसांना मिळाली आहे. 30 हजार रुपये महिन्याकाठी पगार असलेल्या या महिला इंजिनिअरच्या घरी इतकी संपत्ती आली कशी, असा प्रश्न आता पोलिसांना पडलेला आहे. त्यांच्या घरात सापडलेल्या अनेक टीव्हींपैकी एका टीव्हीची किंमत 30 लाख रुपये (Big TV) इतकी असल्याचं समोर आलंय.
हेमा मीणा यांना दरमहिना 30 हजार पगार होता. त्यांच्या पगाराचा विचार केला तर गेल्या 13 वर्षांच्या नोकरीत त्यांची संपत्ती 232 टक्के जास्त असल्याचं समोर आलंय. नोकरीत मिळणाऱ्या पगाराचा विचार केल्यास त्यांची संपत्ती फारतर 18 लाखांपर्यंत असायला हवी होती. प्रत्यक्षात ती कोट्यवधींची असल्याचं दिसतंय.
हेमा यांची संपत्ती ऐकाल तर चाट पडाल
1. सहाय्यक इंजिनिअर असलेल्या हेमा मीणा यांच्या वडिलांच्या नावावर 20 हजार स्क्वेअर फूट जमिनीवर 40 खोल्यांचा बंगला आहे. त्यात हे कुटुंब राहतं.
2. या बंगल्याची किंमत कोट्यवधी रुपयांची असल्याचं सांगण्यात येतंय.
3. फार्महाऊसवर 50 पेक्षा जास्त परदेशी कुत्रे असल्याचं समोर आलं आहे. या कुत्र्यांची किंमतच काही लाखांमध्ये आहे.
4. फार्महाऊसवर 60 ते 70 वेगवेगळ्या वंशांच्या गायीही आहेत.
5. या बंगल्यात काही डझन कर्मचारी नोकरीला आहेत. त्यांच्याशी वीणा या वॉकीटॉकीनं संपर्कात असल्याचं समोर आलंय.
6. बंगल्यात रोटी मशिन मिळालंय. या मशिनमधून कुत्र्यांसाठी रोटी तयार करण्यात येते. याची किंमत अडीच लाखांच्या घरात आहे.
7. घरात लक्झरी आयटमची रेलचेल असल्याचं पाहायला मिळालंय.
8. एका खोलीत 30 लाखांचा टीव्ही सेट सापडला आहे.
9. हा टीव्ही बॉक्समध्ये पॅक अवस्थेत सापडला आहे.
10. दोन ट्रक, 1 ट्रॅक्टर आणि महिंद्रा थारसह 10 महागड्या गाड्या
सोलर पॅनल पाहण्याच्या बहाण्याने टीम घरात
लोकायुक्त पोलिसांची 50 जणांची टीम जेव्हा वीणा यांच्याविरोधात छापेमारी करण्यासाठी पोहचली तेव्हा बंगल्याबाहेर असलेल्या गार्ड्सनी त्यांना आत जाण्यास विरोध केला होता. साध्या कपड्यात असलेल्या काही पोलिसांनी त्यांना पशुपालन विभागाचे अधिकारी असल्याचं सांगितलं. सोलर पॅनल पाहण्यासाठी आल्याचं कारण देण्यात आलं. त्यानंतर घरात ही टीम शिरली. हेमा मीणा यांना एका खोलीत नेण्यात आलं आणि मोबाईल जप्त करण्यात आला. त्यानंतर झाडाझडती घेण्यात आली.
13 वर्षांपासून नोकरीत
पतीपासून घटस्फोट झालेली हेमा वीणा ही रायसेन जिल्ह्यातील चपना गावातील रहिवासी आहे. 2011 साली ही नोकरी लागली होती. 2020 साली हेमाच्या विरोधात उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा जास्त संपत्तीच्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला होता. आता या प्रकरणी इतरही काही अधिकाऱ्यांची चौकशी आणि घरांवर छापेमारी होण्याची शक्यता आहे.