अयोध्या नगरीचा होणार कायापालट! अयोध्येत एक ग्रीनफील्ड टाउनशिपचा विकास
लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी म्हणून जलदगतीने विकास होत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अयोध्या नगरीचा कायापालट ध्वजारोहणापूर्वीच आधुनिक रूपात होत आहे. सौर ऊर्जा आणि इतर नवीकरणीय ऊर्जेच्या वापराद्वारे शहराला पर्यावरणपूरक बनवण्यावर विशेष भर दिला जात आहे. शहरातील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम केली जात असून १२०० सीसीटीवी कॅमेरे बसवले जात आहेत, ज्याद्वारे संशयास्पद हालचाली आणि व्यक्तींवर सतत लक्ष ठेवले जाईल. येत्या काही वर्षांत अयोध्येचा विकास नवा मानदंड निर्माण करीत जगभरात आपली छाप उमटवेल. आध्यात्मिक नगरी अयोध्या विकासाचे नवे मापदंड निर्धारित करत आहे.
सूर्यनगरी म्हणून ओळख पुन्हा प्राप्त करण्याच्या उद्देशाने धार्मिक वारसा, आधुनिक तंत्रज्ञान, हरित ऊर्जा आणि शाश्वत शहरी विकासाच्या संयोगातून अयोध्येला नव्या रूपात घडवण्यात येत आहे. ‘म्युझियम ऑफ टेंपल’, ग्रीनफील्ड टाउनशिप, सौर ऊर्जा शहर, डिजिटल वर्चुअल दर्शन, वैदिक वन आणि हवामान-आधारित सुरक्षा प्रकल्पांसारख्या उपक्रमांनी अयोध्येला जागतिक धार्मिक पर्यटन, आरोग्य सुरक्षा आणि हरित विकासाच्या प्रमुख केंद्र म्हणून स्थापित करण्याचा पाया मजबूत केला आहे. उत्तर प्रदेशातील १७ स्मार्ट शहरांच्या यादीत अयोध्या पहिल्या क्रमांकावर आहे. अयोध्या महायोजना २०३१ अंतर्गत अयोध्येला पूर्णपणे सौर ऊर्जेवर आधारित नगरी म्हणून विकसित केले जात आहे.
अयोध्येचा विकास ग्रीनफील्ड टाउनशिप प्रकल्पाच्याअंतर्गत करण्यात येत असून, यात आधुनिकता आणि पर्यावरण संरक्षण या दोन्ही गोष्टींना समान प्राधान्य दिले जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनानुसार ‘नव्य अयोध्या’ योजनेअंतर्गत ५५० एकर क्षेत्रात उभ्या राहणारी ही हायटेक टाउनशिप राज्यातील सर्वात प्रगत प्रकल्पांपैकी एक ठरत आहे. येथे अंडरग्राउंड ड्रेनेज, इलेक्ट्रिकल डक्ट यांसारख्या अत्याधुनिक संरचनांवर २१८ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. २०० एकर हरित क्षेत्रासोबत सुपर-स्पेशॅलिटी मेडिकल सेंटर, हायटेक पार्क आणि वेलनेस हब विकसित होत आहेत, ज्यामुळे ही टाउनशिप एक आधुनिक, पर्यावरणपूरक आणि भविष्याभिमुख स्मार्ट सिटीचा नमुना निर्माण करेल.
आध्यात्मिक नगरी अयोध्येला हायटेक शहरात रूपांतरित करण्याचा उद्देश व्यापक आहे. यामुळे परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधांचा लाभ मिळेल तसेच स्थानिक नागरिकांनाही सुधारित सुविधा उपलब्ध होतील. उत्तर प्रदेश सौर ऊर्जा धोरण २०२२ अंतर्गत अयोध्येला मॉडेल सोलर सिटी घोषित करण्यात आले आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडद्वारे सरयू काठावरील दोन गावांमध्ये ४० मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारला आहे. 165 हेक्टर सरकारी जमिनीवर ३० वर्षांच्या लीजवर कार्यान्वित असलेला हा प्रकल्प शहराच्या १९८ मेगावॅट वीज मागणीपैकी २५–३०% पुरवठा करत आहे. हा उपक्रम अयोध्येला ऊर्जा स्वावलंबन आणि स्वच्छ ऊर्जेच्या व्यापक वापराच्या दिशेने अग्रगण्य मॉडेल सिटी बनवत आहे.
अयोध्या विकास प्राधिकरणाच्या ग्रीन फंडद्वारे ७५ स्थळांवर १५,००० वृक्षारोपणाची प्रक्रिया राबवली जात आहे, ज्यामध्ये मियावाकी पद्धतीचा समावेश असेल. तसेच एडीएद्वारे टाटा पॉवर, रिलायन्स आणि अदानी समूहाच्या सहकार्याने १३ सार्वजनिक स्थळांवर ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारले जात आहेत. त्यापैकी १० स्टेशन सुरू झाले असून उर्वरित ३ स्टेशन लवकरच कार्यान्वित केले जातील. या सर्व उपक्रमांमुळे अयोध्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातही नवे विक्रम प्रस्थापित करत आहे.






