ज्ञानवापी प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय; मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजा करण्याची मिळाली परवानगी

हिंदू भाविकांना मशिदीच्या तळघरात पूजा अर्चा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या निर्देशामुळे हिंदू पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण असून अनेक ठिकाणी हिंदू बांधव जल्लोष व्यक्त करत आहेत.

    वाराणसी : वाराणसीतील (Varanasi) ज्ञानवापी प्रकरण (Gyanvapi Mosque case) हे सध्या कोर्टामध्ये चालू असून यावर सुनावणी पार पडत आहे. दरम्यान, हिंदू याचिकाकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हिंदू भाविकांना मशिदीच्या तळघरात पूजा अर्चा करण्याचे निर्देश न्यायालयाने (Gyanvapi case)दिले आहेत. या निर्देशामुळे हिंदू पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण असून अनेक ठिकाणी हिंदू बांधव जल्लोष व्यक्त करत आहेत. सध्या हा भाग बंद असून जिल्हा प्रशासनाने पूजाअर्चा करण्याची सुविधा देण्याचे देखील न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

    वाराणसी कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार ज्ञानवापी परिसरातील ‘व्यास का तैखाना’ हा परिसर आहे. या भागामध्ये आता हिंदूंना आरती-पूजा करता येणार आहे. वाराणसी कोर्टाने यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या असून येत्या सात दिवसात यासंदर्भात आवश्यक व्यवस्था करुन देण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात सात दिवसांत व्यवस्था करुन द्यावी लागेल. त्यामुळे आता सर्वांना पूजा करण्याचा अधिकार मिळेल. असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या तळघरात 1993 पूर्वी पूजा व्हायची असं सांगितलं जातं. अयोध्येतील बाबरी पाडल्यानंतर ज्ञानवापीच्या चारी बाजूंना प्रशासनाने लोखंडाचे बॅरिकेंडिग लावले होते. आता ही पूजा पुन्हा सुरु करण्याची हिंदू पक्षांना परवानगी देण्यात आली आहे.

    हिंदू पक्षकारांचे वकील विष्णू शंकर जैन यांनी याबाबत माहिती दिली आहे. माध्यमांसमोर भूमिका मांडताना वकील विष्णू शंकर जैन म्हणाले, “हिंदूंचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. जिल्हा प्रशासन सात दिवसांत तिथे व्यवस्था उभी करणार आहे. त्यानंतर हिंदू तिथे पूजाअर्चा सुरू करतील. काशी विश्वनाथ ट्रस्टकडून हे पूजापाठ केली जाईल. आमची कायदेशीर लढाई होती, ती पूर्ण झाली आहे. यापुढे आता काशी विश्वनाथ पीठ ट्रस्ट निर्णय घेईल. न्यायाधीश के. एम. पांडे यांनी 1 फेब्रुवारी 1986 रोजी राम मंदिराचे टाळे उघडण्याचा निर्णय दिला होता. आजच्या निर्णयाची तुलना आम्ही न्यायाधीश पांडे यांच्या निर्णयाशी करत आहोत. वाराणसी जिल्हा न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक असा आहे. यापुढे आता वजूखान्याचा सर्व्हे करणे, हे आमच्या लक्ष्य असेल” असे मत वकील विष्णू शंकर जैन यांनी मांडले.