File Photo : Mamata-banerjee
कोलकाता : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील एका महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणानंतर एकच खळबळ उडाली होती. आता हे प्रकरण चांगलंच तापताना दिसत आहे. याच घटनेवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधान केलं आहे. ‘दोषींना फाशी झालीच पाहिजे, पण निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये’, असे त्या म्हणाल्या.
हेदेखील वाचा : महाविकास आघाडीचा मेळावा; उद्धव ठाकरेंना मिळणार मोठी जबाबदारी?
कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये जमाव दाखल झाला होता. या रुग्णालयात एका कनिष्ठ डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आला होता. रुग्णालयात घुसलेल्या जमावाने तोडफोडही केली. आता या घटनेवर ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या गदारोळासाठी त्यांनी डाव्या पक्षांना तसेच भाजपला जबाबदार धरले आहे. दुसरीकडे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने रुग्णालयातील अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. याशिवाय पीडितेच्या कुटुंबीयांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.
या घटनेमागे बाहेरील लोकांचा हात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणार असून, त्यासाठी मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. सीपीआय (एम) आणि भाजपवर निशाणा साधत त्या म्हणाल्या की, ‘एआयचा वापर करून बनावट व्हिडिओ बनवले जात आहेत. आणि ते सोशल मीडियावर पसरवले जात आहेत. त्यामुळे लोकांनी या बनावट व्हिडिओंना बळी पडू नये’ असे आवाहन केले आहे.
डॉक्टरांनी कामावर परतावे
बंगालमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी डावे पक्ष आणि भाजप यांनी हातमिळवणी केल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला आहे. ते लोक निषेधाचा फायदा घेत आहेत. त्यांना शांतता नको आहे. भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रध्वज घेऊन आंदोलनात उतरले होते, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे (डीवायएफआय) झेंडेही दिसत होते.
सीबीआय चौकशी
दरम्यान, सीबीआयच्या पथकाने आरजी कार मेडिकल कॉलेजच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. सीबीआयने रुग्णालयातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. तपास यंत्रणेने पीडितेच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली आहे. त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : 2024 मध्ये भारतातील सर्वात धोक्यात असलेल्या प्रजाती कोणत्या? जाणून घ्या