संग्रहित फोटो
इम्फाळ : मणिपूरमध्ये (Manipur Violence) गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार पूर्णपणे थांबलेला नाही. आता राज्यातील तणावावर नियंत्रण मिळविण्याची जबाबदारी एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली आहे. 2015 मध्ये म्यानमारमध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
मणिपूर सरकारने कर्नल (निवृत्त) अमृत संजेनबम यांची मणिपूर पोलिस विभागात वरिष्ठ अधीक्षक पदावर नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. संजेनबम यांनी 21 पॅरा स्पेशल फोर्समध्ये काम केले आहे. त्यांना कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र असे लष्करी सन्मानही मिळाले आहेत. यासंदर्भात मणिपूरच्या गृह विभागाच्या संयुक्त सचिवांनी आदेश जारी केला. मणिपूरातील हिंसाचारात आतापर्यंत 170 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हजारो लोकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. या नियुक्तीवर कुकी संघटना खूश नाहीत. मैतेई समाजाच्या अधिकाऱ्यांना राज्यात उच्च पदांवर बढती दिली जात असल्याचा आरोप यांनी केला.
पाच दिवसांत घटनांत वाढ
मणिपूरमध्ये गेल्या पाच दिवसांत किमान डझनभर लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 30 जण जखमी झाले आहेत. मणिपूर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मेईतेई समुदायाला एसटी दर्जा देण्याचे निर्देश दिल्यानंतर हिंसाचार सुरू झाला. 3 मे रोजी ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियनने आंदोलन केले. यानंतर कुकी समुदाय आणि मेईती यांच्यात हिंसाचार झाला.