Photo Credit- Social Media
Marathi Breaking news live updates: भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या 92 वर्षी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीन एम्स (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स) मध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
27 Dec 2024 07:52 PM (IST)
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच त्यांच्या देशाच्या प्रगतीच्या योगदानाची आठवण करुन दिली आहे. मोहन भागवत यांनी आरएसएसच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले आहेत की, भारताचे माजी पंतप्रधान आणि देशाचे ज्येष्ठ नेते डॉ. सरदार मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण देश अत्यंत दुःखी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य प्रियजनांना आणि चाहत्यांना मनापासून शोक व्यक्त करतो, असे लिहिण्यात आले आहे.
27 Dec 2024 06:24 PM (IST)
देशाचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्यानंतर काल (दि.26) रात्री 9.51 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. जगभरातून डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली जात आहे. अर्थकारणातील सरदार हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशामध्ये सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कॉँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील आदरांजली वाहिली आहे.
27 Dec 2024 05:49 PM (IST)
2004 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीने (यूपीए) निवडणुकीत विजय मिळवला तेव्हा सोनिया गांधी पंतप्रधान होतील, असे मानले जात होते. एकीकडे काँग्रेस पक्ष सोनिया गांधींनी पंतप्रधानपद स्वीकारावे, असा आग्रह धरत होता, तर विरोधक त्यांच्या परदेशी वंशाच्या मुद्द्यावरून विरोध करत होते. या गदारोळात माजी अर्थमंत्री आणि प्रगल्भ अर्थतज्ज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करण्याची घोषणा करण्यात आली. त्यांना पंतप्रधान बनवण्याची कहाणी खूप रंजक आहे.
27 Dec 2024 05:13 PM (IST)
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे व्यक्तिमत्व अगदी साधे होते. ज्यामुळे ते सामान्य लोकांमध्ये सुद्धा लोकप्रिय होते. मनमोहन सिंग यांना अनेक गोष्टी आवडत होत्या, त्यातीलच एक म्हणजे कारमधून फिरण्याची आवड. म्हणूनच त्यांच्या ताफ्यात अनेक कार्स होत्या. १९९६ मध्ये मनमोहन सिंग यांनी मारुती 800 खरेदी केली होती. त्यावेळी या कारची किंमत किती असेल, त्याचे फीचर्स काय आहे? याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
27 Dec 2024 04:30 PM (IST)
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. काल (दि.26) त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. उद्या (दि.28) डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. सध्या त्यांचे पार्थिव मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहे. डॉ. मनमोहन यांच्या निधनामुळे जगभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. अनेकांनी हा मोठा धक्का असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र मनमोहन सिंग यांना माजी पंतप्रधान राजीव गांधी हे एकदा भरसभेमध्ये जोकर म्हणाले होते. मात्र यामागे एक कारण देखील होते.
27 Dec 2024 03:37 PM (IST)
भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरूवारी (26 डिसेंबर) रात्री अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील एम्स रुग्णालायता त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ.मनमोहन सिंग हे केवळ भारताचे पंतप्रधानच नव्हते, तर त्यांनी अर्थमंत्री म्हणूनही काम केले होते. 90 च्या दशकात जेव्हा देश मोठ्या आर्थिक संकटात होता, तेव्हा अर्थमंत्री म्हणून त्यांनी असे मोठे निर्णय घेतले ज्याने भारतीय अर्थव्यवस्थेचे चित्र पूर्णपणे बदलून टाकले, आर्थिक उदारीकरणात त्यांचे विशेष योगदान होते. पण त्यांच्या निधनाच्या निमित्ताने आता त्यांच्या पीएचडीही चर्चेत आली आहे.
27 Dec 2024 01:57 PM (IST)
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 10 वाजता राजघाटावर अंतिम संस्कार होतील अशी माहिती समोर आली आहे.
27 Dec 2024 01:21 PM (IST)
आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना भारतरत्न द्या, अशी मागणी केली आहे.
27 Dec 2024 01:07 PM (IST)
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांचे वय 92 वर्षे होते. दिल्ली विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर, देशाचे अर्थमंत्री आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधान हा त्यांचा प्रवास अभूतपूर्व आहे. 2004 ते 2014 दरम्यान, या काळात ते देशाचे पंतप्रधान होते. याच काळातच मनमोहन सिंग यांनी त्यांच्या सरकारने असे निर्णय मोठे निर्णय घेतले ज्या निर्णयांमुळे फक्त देशातील लोकांचे नशीबच बददले नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही बुस्टर डोस मिळाला.
27 Dec 2024 12:41 PM (IST)
मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना शरद पवार म्हणाले, "मनमोहन सिंग यांनी देशसेवेत महत्त्वाचे योगदान दिले, पण आज ते आपल्यात नाहीत. मुंबईपासून त्यांचे आणि माझे नाते आहे. मी मुख्यमंत्री असताना. ते आरबीआयचे गव्हर्नर होते. त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था संकटात होती, तेव्हा त्यांनी स्वत: RBI गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला आणि देशाला पुढे नेले.
27 Dec 2024 11:22 AM (IST)
मनमोहन सिंग यांना पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहिली.
#WATCH | Delhi | PM Narendra Modi pays last respects to late former PM Dr Manmohan Singh and offers condolences to his family pic.twitter.com/7vn1PB1Xdj
— ANI (@ANI) December 27, 2024
27 Dec 2024 11:20 AM (IST)
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनावर असदुद्दीन ओवेसी यांनी शोक व्यक्त केला आहे. डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दु:ख झाल्याचे ओवेसी म्हणाले. फाळणीनंतर आलेले निर्वासित आरबीआयचे गव्हर्नर, अर्थमंत्री आणि पंतप्रधान झाले.अल्पसंख्याक आणि मागासवर्गीयांसह भारतातील उपेक्षित लोकांच्या उत्थानासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे पंतप्रधान म्हणून मी त्यांची नेहमीच आठवण ठेवीन.
27 Dec 2024 11:08 AM (IST)
मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांची आई सोनिया गांधी त्यांच्या घरी पोहोचले आहेत.
27 Dec 2024 10:41 AM (IST)
वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या आहेत. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काही वेळापूर्वी त्यांना अंतिम श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर माजी पंतप्रधानांच्या निवासस्थानातून बाहेर पडले.
27 Dec 2024 10:01 AM (IST)
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. अमेरिकेपासून अफगाणिस्तानपर्यंत... जगातील दिग्गज मनमोहन सिंग यांचे स्मरण करत आहेत आणि त्यांना श्रद्धांजली वाहतात. स्टीफन हार्पर, हमीद करझाई, अब्दुल्ला शाहिद यांसारख्या जागतिक नेत्यांनी डॉ.मनमोहन सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
27 Dec 2024 09:53 AM (IST)
केंद्री. गृहमंत्री अमित शाह डॉ.मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. तर काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या निवासस्थानी रवाना झाले आहेत. त्यादृष्टीने मनमोहन सिंग यांच्या निवासस्थान परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. गर्दी वाढली आहे. पीएम मोदींसाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
27 Dec 2024 09:50 AM (IST)
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अविभाजित भारतातील पंजाब प्रांतातील गाह गावात झाला. हा भाग आता पाकिस्तानात आहे. देशाची फाळणी झाली तेव्हा मनमोहन सिंग यांचे कुटुंब अमृतसरमध्ये येऊन स्थायिक झाले. येथूनच त्यांची खरी कारकीर्द सुरू झाली. मनमोहन सिंग यांचा जन्म झालेल्या पाकिस्तानातील गावात त्यांच्या नावाची शाळाही आहे. ते ‘मनमोहन सिंग गव्हर्नमेंट बॉईज स्कूल’ म्हणून ओळखले जाते.
27 Dec 2024 09:08 AM (IST)
मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, "भारताचे माजी पंतप्रधान आणि देशाचे ज्येष्ठ नेते डॉ. सरदार मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण देशाला अत्यंत दु:ख झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि असंख्य प्रियजनांसाठी संवेदना व्यक्त व्यक्त करतो. सामान्य पार्श्वभूमीतून आलेले असूनही, डॉ. सिंग यांचे भारतासाठीचे योगदान नेहमीच स्मरणात राहील.
27 Dec 2024 08:48 AM (IST)
कर्नाटकातील बेळगावी येथून परतलेले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनावर काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले, "हे खूप दुःखद आहे. ते एक महान पंतप्रधान होते ज्यांनी देशाची सेवा केली. आम्ही आमचे सर्व कार्यक्रम रद्द करून परत दिल्लीला जात आहोत.
27 Dec 2024 08:39 AM (IST)
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राष्ट्रपती भवनात राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आला. माजी पंतप्रधानांचे वयाच्या92 व्या वर्षी निधन झाले. भारत सरकारने आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत आणि 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.