महाराष्ट्र नवनिर्माण सेने(MNS)चे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. त्यासाठी मनसे नेत्यांसह कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांनी आपला सदर दौरा स्थगित केला. दरम्यान, मनसेचे नेते आणि कार्यकर्ते ५ जूनचा अयोध्येत दाखल झाले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा करताच तेथील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी त्यांना विरोध केला होता. तसेच, जोपर्यंत उत्तरभारतीयांची माफी मागणार नाही तोपर्यंत अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यावर राज ठाकरे यांनी आपल्या प्रकृती कारणास्तव आणि होणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे दौरा स्थगित केला. मात्र, बृजभूषण सिंह यांच्याविरोधाला न जुमानता मनसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत.
अविनाश जाधव यांचा व्हिडीओ
ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव (Avinash Jadhav) हे मनसेच्या कार्यकर्त्यांसह अयोध्येत दाखल झाले आहेत. त्यांनी तेथून एक व्हिडीओसुद्धा शूट करुन आपल्या फेसबूकवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अविनाश जाधव यांनी म्हटले की, आजची तारीख पाच जून. सन्माननीय श्री राजसाहेब यांचा अयोध्या दौरा होता. काही कारणास्तव तो रद्द झाला, पण त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांनी तो पूर्ण केला. मराठी माणसाचा स्वाभिमान जपला.
मराठी बांधवांना विनंती…
मी अविनाश जाधव मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष… मी आत्ता आहे अयोध्येत. राम जन्मभूमीत आम्ही दाखल झालो आहोत. रामलल्लाचे दर्शन प्रत्येक हिंदूने घेतले पाहिजे. आज मी इथे आलो आहे. मी प्रत्येक मराठी बांधवांना विनंती करतो की तुम्ही अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनाला या. आज ५ तारीख आहे आणि एक मराठी माणूस अयोध्येत आला आणि त्याने श्रीरामाचं दर्शन घेतले आहे.