सुहेलदेव भारतीय समाज पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस नंदिनी राजभर यांची हत्या; घरातच चाकूने भोसकून केला खून

उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यात सुहेलदेव समाज पक्षाच्या 30 वर्षीय महिला नेत्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. सुभासपा नेत्या नंदिनी राजभर यांच्या हत्येने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

    संत कबीर नगर : उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यात सुहेलदेव भारतीय समाज पक्षाच्या 30 वर्षीय महिला नेत्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. सुभासपा नेत्या नंदिनी राजभर यांच्या हत्येने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. नंदिनी या सुभासपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस पदावर कार्यरत होत्या. खलीलाबाद कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दिघा बायपास परिसरात ही घटना घडली.

    नंदिनीच्या अंगावर चाकूच्या अनेक जखमा आढळल्या आहे. नंदिनी राजभर या घरातील खोलीत पलंगाखाली जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत आढळल्या. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून नंदिनी यांना धमक्या येत होत्या. त्यामुळे त्या तणावात होत्या, असे कुटुंबीयांनी सांगितले.

    नंदिनी यांची सासू आरती देवी यांनी सांगितले की, रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता नंदिनीला फोन केला होता. मात्र, ती खोलीतून बाहेर आली नाही. त्यांनी तिच्या खोलीत डोकावले असता नंदिनी पलंगाखाली रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.