Photo Credit- Social Media पहलगाम हल्ल्यातील मोठा सुगावा NIAच्या हाती...; कोण आहे का मुश्ताक अहमद जरगर?
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) हाती एक मोठा सुगावा लागला आहे. पहलगाम हल्ल्यात अल उमर मुजाहिदीनचा प्रमुख मुश्ताक अहमद जरगरची भूमिका समोर आली आहे. जरगरच्या समर्थकांनी पहलगाम हल्ल्यातील ओव्हरग्राउंड वर्कर्सला मदत केल्याची माहिती NIAच्या तपासात आढळून आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुश्ताक अहमद जरगर हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशनल कमांडर असून तो २०१९ च्या पुलवामा हल्ल्यातील आरोपी देखील आहे. डिसेंबर 1999 च्या कंदहार अपहरण प्रकरणात मौलाना मसूद अझहर आणि मुश्ताक जरगरची सुटका झाली होती. तो सध्या पाकिस्तानात राहत आहे. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अटक केलेल्या ओव्हरग्राउंड कामगारांच्या चौकशीदरम्यान हा महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे.
पाकिस्तानच्या घशाला पडणार कोरड; चिनाब नदीवरील बागलीहार प्रकल्पाचे पाणी अडवण्याचा भारताचा निर्णय
जरगरच्या दहशतवादी संघटनेवर भारत सरकारने बंदी घातली आहे आणि २०२३ मध्ये त्याच्या घरावर राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून जप्ती आणण्यात आली होती. मुश्ताक जरगर सध्या पाकिस्तानात असून तो श्रीनगरचा असल्याने त्याचा ओव्हरग्राउंड कामगार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये प्रभाव असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील जरगरच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे.
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतेक पर्यटक होते. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई केली आणि सिंधू पाणी करार स्थगित केला. तसेच पाकिस्तानी व्हिसा रद्द करण्यात आला. भारताने पाकिस्तानसोबतचा सर्व व्यापार पूर्णपणे बंद केला.
१९९९ मध्ये नेपाळमधून इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करण्यात आले होते. दहशतवाद्यांनी ते काठमांडूहून अमृतसर आणि लाहोर आणि नंतर अफगाणिस्तानातील कंदहारला नेले. या विमानात १८० प्रवासी होते. या प्रवाशांच्या बदल्यात दहशतवाद्यांनी मौलाना मसूद अझहरसह ३ दहशतवाद्यांना सोडण्याची अट ठेवली होती. दहशतवाद्यांनी विमानाचे अपहरण एक आठवडाभर ठेवले. प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने तिन्ही दहशतवाद्यांना सोडण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मौलाना मसूद अझहर, मुश्ताक अहमद जरगर आणि अहमद उमर सईद शेख यांचा समावेश होता. या दहशतवाद्यांना एका विशेष विमानाने कंधारला नेण्यात आले. याच मसूद अझहरने २००० मध्ये जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना स्थापन केली होती.