(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस सीझन ६ मधील स्पर्धक सचिन कुमावत फार कमी वेळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सीझनच्या पाचव्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भरघोस मतांनी सचिनला सेफ केले गेले, यानंतर ते खूप भावुक दिसले. आपल्या अहिराणी गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारे सचिन कुमावत, अहिराणी भाषेचा डंका जगभर पोहचवण्यासाठी या प्रवासावर आहेत. त्यांच्या संघर्षपूर्ण आणि प्रेरणादायी प्रवासामुळे प्रेक्षकांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम अधिक वाढले आहे.
अगदी सुरुवातीच्या काळात लग्नात वाजणाऱ्या बँड मुळे सचिनला संगीतात आकर्षण निर्माण झालं. पुढे आपणही यात काम करावं अशी इच्छा सचिनच्या मनात निर्माण झाली, मुलगा लवकर आपल्या पायावर उभा राहील या आशेने सचिनच्या वडिलांनी सुद्धा त्याला संगीताचे क्लास लावले आणि त्यातून सचिनने स्वतःचा बँड उघडला. २००२ पासून सुरू झालेल्या प्रवासाला अचानक वळण लाभलं ते एका म्युझिक अल्बमच्या निमित्तानं. म्युझिक अल्बम करण्यासाठी त्याला दिग्दर्शक म्हणून निवडण्यात आलं, शिवाय त्याच अल्बम मध्ये मुख्य नायकाची भूमिका देखील बजावली.
या अल्बमला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला, संगीत सोडण्याचा निर्णय घेतलेल्या सचिनचा आत्मविश्वास पुन्हा एकदा वाढला आणि तिथून पुढे सचिनने महाराष्ट्रालाच नाही तर जगाला उत्तमोत्तम गाणी दिली.
बिग बॉसच्या सहाव्या सिझनचा आजपासून सहावा आठवडा सुरू झाला आहे. घरात पहिल्या दिवसापासून रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत असतात. गेल्या आठवड्यात वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर बिग बॉसच्या घरातून दोन स्पर्धकांचा या घरातील प्रवास इथेच थांबला. त्यामुळे आता घरात राखीला वगळून फक्त 11 स्पर्धक आहेत. आयुष संजीवची तब्येत ठिक नसल्यामुळे तो दोन आठवड्यांपासून खेळात सक्रिय नव्हता. त्यामुळे वींकेडला आयुष घराबाहेर जाणार असा अंदाज सगळ्यांनी वर्तवला होता. पण, याच्यासोबत सोशल मीडिया स्टार करण सोनावणेचं अनपेक्षिक एव्हिक्शन झालं आहे.






