पाकिस्तान(Pakistan)कडून राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मिरात ड्रोन (Drone) पाठवून घुसखोरी करण्याचा सतत प्रयत्नात असते. आज पुन्हा पाकिस्तानने अशाच प्रकारे केलेला प्रयत्न सीमा सुरक्षा दलने उधळून लावला आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून काश्मीर भागात ड्रोनचा वापर करून टिफिन बॉक्समधून टाईम बॉम्ब पाठवण्यात आले होते. मात्र, बीएसएफने सदर बॉम्ब निष्क्रिय केले आहेत.
काश्मिर कानाचक परिसरात सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास बीएसएफला (BSF) ड्रोन दिसले. जवानांनी त्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर लगेचच परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. ड्रोनला जोडलेले पेलोडमध्ये मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये पॅक केलेले तीन चुंबकीय आयईडी बॉम्ब होते. या बॉम्बमध्ये टाइमर वेगवेगळ्या वेळेसाठी सेट केला गेला होता. हे आयईडी बॉम्ब निष्क्रिय करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ड्रोन हवेत सुमारे ८०० मीटर उंचीवर उडत होता. याआधी कठुआ जिल्ह्यातही बीएसएफने एक ड्रोन पाडला होता. त्यामध्ये स्फोटके सदृश्य वस्तू आढळली होती. स्थानिकांना हे संशयित ड्रोन दिसले होते. सीमेपलीकडून सातत्याने ड्रोनच्या हालचाली होत असल्याने पोलिसांची शोध पथके परिसरात तैनात करण्यात आली आहेत. दक्षिण काश्मीर हिमालयातील प्रसिद्ध अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी ही घटना घडली आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.