पंतप्रधान मोदींनाच जीवे मारण्याची धमकी; बिहारमध्ये संशयिताला अटक
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत. गुरुवारी, २९ मे २०२५ रोजी ते पाटणा येथे पोहोचले आणि त्यांनी शहरात भव्य रोड शो केला. आज, ३० मे रोजी त्यांचा रोहतास जिल्ह्यातील बिक्रमगंज येथे एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एक व्यक्ती अडचणीत आला आहे. भागलपूरमध्ये या व्यक्तीला अटक करण्यात आली असून, गुरुवारी एसएसपी कार्यालयाने याबाबत अधिकृत माहिती दिली. या प्रकारामुळे सुरक्षेच्या दृष्टीने खळबळ उडाली असून, प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहार दौऱ्यादरम्यान त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव समीर कुमार रंजन असे असून, त्याचे वय सुमारे ३५ वर्षे आहे. भागलपूर येथील एसएसपी कार्यालयाने गुरुवारी (२९ मे २०२५) जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये सांगण्यात आले की, पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान मिळालेल्या धमकीच्या माहितीची गंभीर दखल घेतली गेली.
सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ कारवाई करत भागलपूर येथील वरिष्ठ पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलिस उपअधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली तपासासाठी विशेष पथक तयार केले. या पथकाने तातडीने तपास सुरू करून आरोपीला अटक केली. या घटनेनंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिस पथकाने मंटू चौधरी नावाच्या एका वृद्ध व्यक्तीला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीनुसार, मंटू चौधरी या वृद्धाने चौकशीत सांगितले की, तो मॅट्रिकही पास झालेला नाही आणि केवळ कीपॅड मोबाईल फोन वापरू शकतो. संपूर्ण प्रकरणात त्याला अडकवण्याचे काम समीर कुमार रंजन याने केले आहे. याच दरम्यान, तपास यंत्रणांना एक मोबाईल नंबर आढळून आला, जो VPN (व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क) चा वापर करून तब्बल ७१ वेळा सक्रिय झाला होता. हा मोबाईल नंबरच संपूर्ण प्रकरणातील एक महत्त्वाचा दुवा ठरू शकतो, अशी शक्यता तपास पथकाने व्यक्त केली आहे.
विशेष पोलिस पथकाने सुलतानगंज पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील महेशी गावातून समीर कुमार रंजन (वय ३५) याला अटक केली. या प्रकरणात त्याच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हॉट्सअॅप कॉलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. चौकशीदरम्यान, समीर कुमार रंजन याने आपली कबुली दिली असून त्याने VPN (व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क) चा वापर करून धमकीचा कॉल केल्याचे मान्य केले आहे.
महायुतीतील अंतर्गत कलह पुन्हा उघड; मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितली ‘ती’ गोष्ट, म्हणाले…
पोलिसांच्या प्राथमिक तपासात समीर आणि त्याच्या सह-भाडेकरूमधील जमिनीच्या वादाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात वापरलेला मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केला असून, त्याच्या फॉरेन्सिक तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. संपूर्ण घटनेचा तपास अधिक खोलवर सुरू असून, या प्रकारामागे आणखी कोणी सामील आहे का, याचा शोध घेण्यात येत आहे.